प्लंबर काम करणाऱ्याने युट्युब पाहून छापल्या बनावट नोटा!

प्लंबर काम करणाऱ्याने युट्युब पाहून छापल्या बनावट नोटा!

पुढे काय झाले? वाचा बातमी..

सोलापूर : भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा सोलापुरात छापल्या जात असल्याची माहिती विजापूर नाका पोलिसांना मिळाली. त्यानुसार विजापूर नाका पोलिसांच्या पथकाने सापळा रचून संशयित दोघा आरोपींना रंगेहाथ पकडले. 

त्यांच्याकडून एक लाखांपर्यंतच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. शानदार चौकातील भारत हौसिंग सोसायटीत बनावट नोटा छपाई सुरू होती. आसरा चौकात संशयितरित्या फिरताना संजय पवारला अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून प्लंबर काम करणाऱ्या विष्णू सिद्राम गायधनकरला अटक केली. शंभर आणि पाचशे रुपयांच्या १ लाख २१ हजार ७९० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

आरोपी गायधनकर हा सोलापूर महानगरपालिकेचा परवानाधारक प्लंबर आहे. त्याने काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर नोटा बनवण्याचा व्हिडिओ पाहिला. त्यानंतर साधा कलर प्रिंटर आणून खऱ्या नोटा स्कॅन केल्या आणि प्रिंट काढल्या. प्राथमिक चौकशीत या नोटा बाजारात खपवण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच गायनधनकरचा साथीदार सापडला गेला, असे पोलिसांनी सांगितले आहे.


कमी वेळेत पैसे कमवण्याच्या नादात गायधनकर आणि त्यांच्या साथीदाराकडून हा प्रकार घडला आहे. त्यांनी कष्टाने पैसे कमवण्यासाठी धडपड केली असती तर ही वेळ आली नसती.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार राजकुमार तोळनूरे, खांडेकर, नरोटे, आलम बिराजदार, लक्ष्मण वसेकर, बालाजी जाधव, इम्रान जमादार, उदयसिंह साळुंखे, पिंटू जाधव, विशाल बोराडे, लखन माळी, राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे.