आता खरं विकासाची जबाबदारी आली आहे!

आता खरं विकासाची जबाबदारी आली आहे!

Vikas Waghmare Article

सोलापूर : सामाजिक कार्यकर्ता असलेल्या विकास वाघमारे यांची वाघोली ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर भारतीय जनता पक्षासह मित्रपरिवारातून अभिनंदन होत आहे. ग्राम विकासाच्या अनुषंगाने विकास हे नेहमीच सातत्याने कार्यरत आहेत. विकास यांनी आपल्या फेसबुकवर एक लेख शेअर केला आहे.

विकास वाघमारे म्हणतात- 

गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाच्या विकासासाठी असलेली एक महत्वाची संस्था म्हणजे ग्रामपंचायत. कालच राज्यातल्या अनेक ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण राजकारणात युवकांचा लक्षणीय प्रवेश दिसला.

मी सोबत जोडलेल्या फोटोला एक वेगळं महत्व आहे, 24 डिसेंबर 2016 रोजी मध्य प्रदेशच्या इंदौरमधील होळकर वाडा परिसरात काढलेला हा फोटो आहे. काल ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रियपणे काम करत असताना सोबत असलेले आणि त्या संघर्षाच्या काळातले 2 जुने सहकारी मित्र ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आले.
त्यातील एक सहकारी मित्र अजय साखरे हा बोरी- उमरगे ता. अक्कलकोट या गावातून वयाच्या 27 व्या वर्षी निवडून आला तर दुसरा सहकारी मित्र ऋतुराज देशमुख हा घाटणे ता. मोहोळ या गावातून वयाच्या 21 व्या वर्षी निवडून आला. एवढंच नाही तर ऋतुराजने अख्खा पॅनलही निवडून आणला, त्याचा विकासाचा जाहिरनामाही चर्चेचा विषय ठरला होता. आणि मी स्वतः 15 दिवसांपूर्वीच वाघोली ता. मोहोळ या गावातून वयाच्या 24 व्या वर्षी बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य झालो.

एका बाजूला युवकांचा राजकारणात प्रवेश वाढतोय याचा आनंद तर आहेच पण आपण संघर्षाच्या काळात सोबत काम केलेले मित्रही यामध्ये विजयी झाले, सक्रियपणे राजकारणात उतरले याचा मला जास्त आनंद झाला.
सोबतच्या फोटोत समोरच्या रांगेत काळ्या कोटमध्ये मी आहे, माझ्या डाव्या बाजूला ऋतुराज देशमुख आहे, आणि आमच्या पाठीमागे गॉगल घातलेला अजय साखरे आहे.


आज आम्ही तिघंही ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने सक्रिय झालो असलो, एका टप्प्यावर यशस्वी झालो असलो तरी आता खरं गावगाड्यासाठीचं काम आणि वेगळेपणा दाखवून देत विकासाची, ग्रामराज्य घडवण्याची जबाबदारी आली आहे. आपल्या मातीसाठी काम करण्याची ही संधी आम्हाला मिळाली आहे.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन, सूचना सदैव असू द्या. चांगलं आणि पारदर्शक काम नक्कीच करू...☺️❤️