सोलापुरात पहिल्यांदा दिसली पांढऱ्या पाठीची मुनिया

सोलापुरात पहिल्यांदा दिसली पांढऱ्या पाठीची मुनिया

सोलापूर : सोलापुरातील पक्षी वैभवात आणखी एका पक्ष्याची नोंद झाली असून पांढऱ्या पाठीची मुनिया (मनोली) पक्ष्याचे पिल्लू नुकतेच शहरामध्ये आढळले.


मंगळवार पेठ येथील शुभांगी सालीमठ यांच्या घराच्या गॅलरीत एका पक्ष्याचे पिल्लू आढळले. त्यास जास्त उडता येत नसल्याने त्यांनी वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन फाउंडेशनचे शिवानंद हिरेमठ यांना माहिती दिली. पक्षिमित्र अजितसिंह चौहान यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, तो पक्षी पांढऱ्या पाठीचा मुनिया असल्याचे स्पष्ट झाले. सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच तो पक्षी आढळला आहे. पर्यावरण स्नेही राजकुमार कोळी त्या पक्ष्याची देखभाल करीत असून त्याची प्रकृती सुधारल्यानंतरच त्यास पुन्हा निसर्गात सोडण्यात येईल. शहर व परिसरात प्रामुख्याने मुनिया पक्षी सहज आढळतात. पण, पांढऱ्या पाठीची मुनिया यापूर्वी दिसली नव्हती. गवताळ माळरान अथवा पाणवठ्याच्या परिसरात त्यांचा वावर असतो. पिल्लू आढळल्याने इतर मोठ्या पक्ष्यांचे सर्वेक्षण पक्षी मित्रांनी सुरू केले आहे.