सापांविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? 

सापांविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? 

जागतिक सर्प दिन विशेष

▪️जगात आढळणाऱ्या 3000 सापांच्या प्रजातींपैकी फक्त 20% साप हे विषारी आहेत आणि त्यातील सुद्धा फक्त 7% साप हे मनुष्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहेत. इतर साप निमविषारी आणि बिनविषारी या वर्गात मोडतात त्यामुळे प्रत्येक साप विषारी आहे असे समजून त्यांना मारणे हे गैर कृत्य आहे.

▪️ साप हा निसर्ग साखळीतील एक महत्त्वाचा अंग असून उंदीर हे त्याचे प्रमुख भक्ष्य असल्याने साप उंदरांवर नियंत्रण ठेवून होणारी अन्नधान्याची नासाडी रोखतात व उंदरांमुळे होणाऱ्या आजारांवर एक प्रकारे नियंत्रण ठेवले जाते.

▪️सापाला विकसित मेंदू नसल्यामुळे सिनेमामध्ये दाखविल्याप्रमाणे तो डूख धरत नाही किंवा पुंगीच्या तालावर नाचत नाही. त्याच्या डोक्यावर नागमणी नसतो आणि तो पुर्णतः मांसाहारी असल्याने दूध पित नाही. या अंधश्रद्धेपोटी सुद्धा सापांना मारण्याचे प्रमाण अधिक आहे.

▪️साप चावल्यानंतर कोणतेच तंत्रमंत्र, झाडपाला किंवा इतर उपचार न करता त्या व्यक्तीला सरळ सरकारी रुग्णालयात घेऊन जावे. सर्पदंशावर निव्वळ एकमात्र उपाय म्हणजे सापाचे प्रतिविष. ह्या व्यतिरिक्त सर्प दंशावर दुसरा कोणताही उपाय नाही.

▪️साप हे वैद्यकीयदृष्ट्या महत्वाचे असून त्यांच्या विषापासूनच सर्पदंशावरील जालीम उपाय असणारे प्रतिसर्पविष तयार केले जाते तसेच अनेक प्रकारच्या आजारांवरील औषधांमध्ये याचा उपयोग केला जातो.

▪️ सापांची तस्करी करणे, साप बाळगणे, त्यांच्यासोबत खेळ करणे, स्टंटबाजी करणे व त्यांचे फोटो/व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणे हे कायद्याने गुन्हा आहे.

▪️साप घरात येऊ नये यासाठी घरातील अडगळ, केरकचरा दूर करा तसेच घरामध्ये पाल व उंदीर यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवा कारण त्यांच्या शोधात साप आपल्या घरात येऊ शकतात.

▪️ आपल्या घरात एखादा साप निघाल्यास आपल्या ओळखीचा सर्पसरक्षक किंवा वन विभागाशी संपर्क करा अथवा #1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा.

- अजित चौहान
वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन, सोलापूर