कुणी याला देवीची वंदना मानलं तर कुणी पब्लिसिटीचा बाजार!

कुणी याला देवीची वंदना मानलं तर कुणी पब्लिसिटीचा बाजार!

सोलापूर : अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवरात्र उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. समाजात आपल्या आजूबाजूला काम करणाऱ्या खऱ्या दुर्गांची छायाचित्रांमधून मांडणी करण्यात आली.

अभिनेत्री तेजस्विनी ही छायाचित्रे सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहेत. या छायाचित्रांचे समाज माध्यमातून कौतुक होत आहे तर काही मंडळींनी हा पब्लिसिटीचा बाजार आहे असे म्हटले आहे.

विजयादशमीच्या दिवशी अभिनेत्री तेजस्विनी हिने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. तेजस्विनी म्हणते -

‘कुणी याला देवीची वंदना मानलं तर कुणी कोव्हीड वॉरीयर्सचे आभार... तर कुणाला वाटला फक्त आमच्या पब्लिसिटी चा बाजार ...

गेले आठ दिवस आम्ही कलाकार म्हणून आमच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करत राहिलो. 
खरं तर या लढाईत झटणारी असंख्य माणसं आहेत, जसं की बँकर्स, पत्रकार , किराणा दुकानदार , फार्मसिस्टस, पोस्टमन  डिलीव्हरी बॉयज, एसटी कर्मचारी, सर्व शासकीय कर्मचारी... पण नवरात्रीच्या निमित्ताने त्यातील प्रातिनिधिक ९ लोकांचा सन्मान करणं आम्हाला शक्य झालं. जे लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे  या लढाईत लढले त्यांना शत शत नमन... तसेच गेले ८ दिवस ज्या ज्या लोकांनी माणुसकीचा हा संदेश निस्वार्थपणे इतरांपर्यंत पोहोचवला त्याचे मनःपूर्वक आभार ! ज्या लोकांना हा  प्रयत्न पटला नाही त्यांना हात जोडून एकच विनंती आमच्या कलाकृतीकडे पाठ फिरवली तरी खऱ्या योद्धयांकडे पाठ फिरवू नका, या दृष्टीने त्यांच्याकडे पहा आणि त्यांचे आभार व्यक्त करा ! 
बाकी सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !  
देव बरे करो..’

Inframe : Tejaswwini 
Design & Illustration : Uday Mohite
Photographer : Vivian Pullan
Writer : Rj Adhishh
Concept & Director : Dhairya
Music credits : Film Philosophy & Ranbir Talwar 

प्रतिपदा :
दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला...
अन मग मी सोडून त्रिशूळ भाला
हाती stethoscope धरला...
घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस
आईच उभी आहे PPE किट मागे
विसर त्याचा पाडू नकोस,
विसर त्याचा पाडू नकोस.

द्वितीय
सद्रक्षणाय खलनिग्रहणायच्या वाटेवरती कर्तव्य अन माणुसकीची कावड माझ्या हाती
तू नाहीस असहाय माते !
हात माझा सदैव तुझ्या हाती
सदैव तुझ्या हाती

तृतीया
मला ना lockdown ची सुट्टी
ना work from home ची मुभा
तुझ्या स्वच्छ श्वासासाठी
देह हा माझा सदैव उभा
देह हा माझा सदैव उभा.....

चतुर्थी
शिवारात या माह्या
कदी आभाय फुटलं, कदी धरिनी रुसली
पन माय हे तुयी हर दैवाशी भांडली
दम धर रे लेकरा हात चालवू दे मले भरभर
तेथं लेकरं हजार वाट पाह्यते मंडईवर...

पंचमी
विषाणूने या जगाची केली कैसी ही दैना
मुक्या लेकरांचे या, अश्रु कुणी पुसेना
आबाळ या जीवांची...आईस साहवेना
मनुष्यरूप घेऊनि धरी, साक्षात आली अन्नपूर्णा.

षष्ठी
नाही मिळत आशिर्वाद मजला, नाही मिळत आभार...
तुझ्या सुखी कुटुंबात माझा प्रवेश, जणू दु:खांचा प्रहार...
बोचऱ्या नजरा असंख्य,अस्वस्थ नकोश्या जाणिवा
दुखावलेल्या लेकरांना,समजेल का माझी ही रुग्णसेवा ?

सप्तमी
बळी पडली निष्पाप लेकरे , तुझ्या देशीच्या विषाणूने
अन् आता गिळू पाहतो आहेस माझी मातृभूमी, तुझ्या राक्षसी महत्वकांक्षेने ?
मोडू नकोस बांध आता माझ्या सहनशक्तीचा.. नाहीतर उडवीन तुझ्या चिंधड्या हजार
गोठला जरी थेम्ब न थेम्ब रक्ताचा.

अष्टमी
प्लास्टिक मध्ये गुंडाळलेला देह तुझा माझ्या समोर येतो
अन माझ्या दोन वेळच्या जेवणाचा प्रवास सुरु होतो.
संसर्ग होईल इतरांना म्हणून कुणी बाहेर आंदोलन करतो,
मी मात्र असते सतत तुझ्या संपर्कात, माझा विचार कोण करतो ?
पण मी जाणते सृष्टीसाठी निर्माण अन मुक्ती दोन्ही आढळ नियम आहेत
आणि म्हणूनच तुला मुक्ती देण्यासाठी हात माझे सज्ज आहेत...

नवमी/ दसरा
मला माहीत आहे लढाई अजून संपली नाही... पण या जगती अमरत्व कुणालाच प्राप्त नाही
कृपा वर्षवेन हजार हातांनी ,देईन तुला सुख , समृद्धी ठायी ठायी
तू फक्त माणूस म्हणून राहण्याची देशील मला ग्वाही ?