तुमचा विसराळूपणा वाढलाय का? मग हे वाचाच..

तुमचा विसराळूपणा वाढलाय का? मग हे वाचाच..
२१ सप्टेंबर - जागतिक स्मृतीभ्रंश दिन विशेष
स्मृतीभ्रंश आणि नोंदवही
वय वाढेल तसे आपल्या स्मृती, विचार आणि वागण्यामध्ये बदल होणे साहजिक आहे. परंतु कधी कधी या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण करू लागतात. तेंव्हा मात्र आपण याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कारण ही एका गंभीर आजाराची म्हणजे स्मृतीभ्रंश ची लक्षणे असू शकतात.
स्मृतीभ्रंश म्हणजे व्यक्तीच्या स्मृती आणि वैचारिक क्षमता मध्ये कमकुवतपणा येतो. अश्या अडचणी आपल्या दैनंदिन जीवनातील कार्ये करताना अडथळा निर्माण करतात. हा वयोमानाप्रमाणे होणारा बदल नक्कीच नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे अल्झायमर नावाचा आजार आहे. यामध्ये व्यक्तीच्या मेंदूतील पेशींची प्रमाणापेक्षा जास्त झीज होते, त्यांचे काम पण कमी होते.

अल्झायमर आजाराची १० प्रमुख लक्षणे- 
१. दैनंदिन जीवन जगताना त्रास देणारा विसराळूपणा
हे सर्वात जास्त दिसून येणारे तसेच सर्वात अगोदर दिसून येणारे लक्षण आहे. यामध्ये प्रथम अलीकडील काळात घडलेल्या घटना व मिळालेली माहिती विसरायला चालू होते. हळूहळू महत्वाच्या तारखा, अपॉइंटमेंट विसरू लागते, सारखं सारखं घरच्या किंवा इतर व्यक्तींना एकच गोष्ट विचारणे, गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मदत लागणे, वस्तू विसरणे इत्यादी.
वयोमानाप्राणे येणाऱ्या विसराळू पणा मध्ये मात्र इतका त्रास होत नाही व अश्या गोष्टी नंतर आठवतात.
२. कामाचे व इतर नियोजन करणे, समस्या सोडवणे जमत नाही
स्मृतीभ्रंश झालेल्या व्यक्तींना नियोजनपूर्वक काम करणे, त्याप्रमाणे टप्याटप्याने प्रगती करणे, समस्या उभ्या राहिल्या तर ऐनवेळी उपाय न समजणे अश्या अडचणी येतात. अश्या कामवर लक्ष केंद्रित करणं जमत नाही, तसेच पहिल्यापेक्षा जास्त वेळ लागणे, चुका वाढणे असे होते. 
३. सवयीची कामे करतानाही अवघड जाणे
नेहमी केली जाणारी कामेही करणे अवघड होते. एखाद्या ठिकाणी जाऊन परत येणे जमत नाही. दुकानातून सामान आणताना चुका होतात. नियम लक्षात ठेवणे जमत नाही.
४. वेळ व जागा याबद्दल संभ्रम निर्माण होणे
तारीख, वार, ऋतु, महिना, वर्ष इत्यादी लक्षात न राहणे, कधी कधी दिवसातील वेळ पण न समजणे यामुळे दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतात. त्यांना स्वतःला आपण कुठे आहोत किंवा कुठे जायचे समजत नाही. रस्ता चुकणे, पत्ता विसरणे अश्या दुर्घटना घडायला सुरुवात होते.
५. नजरचुका वाढणे, रंग किंवा अंतर यांचा अंदाज न येणे
काही रुग्णांमध्ये वाचताना चुका होतात, त्यांना अंतर, रंग, रंगछटा यांचा गोंधळ उडतो. त्यामुळे वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता वाढते.
६. संवादकौशल्य कमी होणे
वस्तूंचे नावे न आठवणे, ऐन वेळी शब्द न सुचणे, इतरांशी बोलताना पुढे काय बोलायचे किंवा समोरचा व्यक्ती काय बोलतोय हे न कळल्यामुळे तान येतो.
७. वस्तू ठेवून विसरून जाणे, हरवून येणे, आणि परत त्या शोधणे अश्यक्य होणे
असे रुग्ण वस्तू नेहमीच्या ठिकाणी ऐवजी अनिश्चित ठिकाणी ठेवतात त्यामुळे अश्या वस्तू हरवतात. त्यांना परत सर्व हालचाली आठवून ती वस्तू शोधणे जमत नाही. आजाराच्या पुढच्या टप्प्यात असे रुग्ण वस्तू हरवण्यासाठी इतरांवर संशय घेऊ लागतात.
८. निर्णयक्षमता कमी होणे, किंवा पूर्णपणे बिघडणे
अश्या रुग्णांना निर्णय घेण्यात अनेक अडचणी जाणवतात. स्वतःचे आर्थिक किंवा इतर वैयक्तिक व्यवहार करताना अनेक चुका होतात. यातून कायदेशीर पेचप्रसंग उभे राहतात. स्वतःचे राहणीमान पण व्यवस्थित ठवणे अवघड जाते. 
९. सामजिक आयुष्यातून व जबाबदाऱ्या मधून स्वतःला वेगळं करणे
संवाद साधण्यात येणाऱ्या अडचणीमुळे असे रुग्ण आपल्या आवडीनिवडी, छंद, सामाजिक कार्य इत्यादी ठिकाणी जाणे टाळायला चालू करतात. स्वतःची आवडती टीम किंवा खेळ लक्षात राहत नाही.
१०. स्वभाव गुण आणि मानसिक स्थिती बिघडत जाणे
आजराच्या पुढच्या टप्प्यात असे रुग्ण संभ्रमाव्थेतून जातात, ते संशयी, उदास, भयभीत आणि बेचैन असतात. ते इतरांवर लगेच चिडतात, नवीन ठिकाणी बेचैन होतात.
मित्रांनो यातून आपण लक्षात घेतले पाहिजे की, वयस्कर व्यक्ती स्मृतीभ्रंश आजाराची वरील लक्षणे दिसत असतील तर आपण त्यांना समजून घेऊया. त्यांना आधार देऊया. त्यांची काळजी घेण्यासाठी पुढे येऊया. 
या आजाराची सोप्या भाषेत ओळख करून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा आपण जन्माला आलो त्या वेळी, आपणास एक नोंदवही भेटली. जी पूर्ण कोरी आहे. त्यामध्ये आपण जन्माला आल्यापासून प्रत्येक क्षण नोंद करत जातोय. या सर्व नोंदी वेळेच्या क्रमाने होत आहेत. आयुष्य जसे पुढे जाईल तसे त्या नोंद वाहितील पाने पण संपत जातील. एक दिवस असा येईल की नोंदवही संपून जाईल. पुढच्या नोंदी करण्यासाठी जागा नसल्यामुळे त्या आठवणी आठवून ठेवता येणार नाहीत. ही या आजाराची सुरुवात होय. म्हणून यामध्ये अलीकडील माहिती व गोष्टी विसरतात. जुने सगळे लक्षात राहते.
आता आपण थोडा पुढे विचार करू. जसा जसा आजार वाढेल तसे तसे या नोंदवहीत असणारी शेवटची पाने नष्ट होत जातात. म्हणजे आठवणी वयाच्या उलट्या क्रमाने नष्ट होतात. एक प्रकारे असा रुग्ण वरचेवर वयाने लहान लहान होत जातो. 
हे उदाहरण लक्षात ठेवले तर अश्या रुग्णांना समजून घेण्यासाठी व यांची काळजी घेताना मदत होते. काळजी घेणाऱ्या व्यक्तींनी स्वताच्या मानसिक आरोग्याची नियमित काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.
चला तर या वर्षीच्या जागतिक स्मृतीभ्रंश दिन २१ सप्टेबर - निमित्त निर्धार करून अश्या रुग्णांना न झिडकरता आधार देऊ.
- डॉ नितीन भोगे
मानसोपचर, व्यसमुक्ती व लैंगिक समस्या तज्ञ
"मनोविश्र्व क्लिनिक"
सुधाकर कॉम्प्लेक्स
पहिला मजला
शर्मा स्वीट जवळ
सात रस्ता, सोलापूर
९१३०६२१५३१