वाचावं असं काही.. दोन सजीवांना जोडणारा एक निर्जीव धागा!

वाचावं असं काही.. दोन सजीवांना जोडणारा एक निर्जीव धागा!

अलविदा... दोनशे साठ एकोणसाठ सोळा!!

एखादी छोटीशी गोष्ट आपलं आयुष्य किती व्यापून टाकते नां? गोष्ट छोटीच पण आयुष्याचं आभाळ भरून टाकते. १९९७ चं  साल असेल. मी सोलापूर तरुण भारतामध्ये काम करायचो. घरही तिथून जवळच. अगदी समोर...गणेश बिल्डर्समध्ये! एक दिवस दूरसंचार खात्याचं (नंतर ते बी एस एन एल झालं)  पत्र आलं. "आपली दूरसंचारच्या सोलापूरच्या स्थानीय सल्ला।गार समितीवर निवड करण्यात आली आहे." एक वर्षांसाठी.  त्याचाच एक भाग म्हणून घरी चक्क फोनही आला! अर्थात, हे शक्य झालं होतं ते आमचे मित्र विनोद तावडे यांच्या धडपडीमुळे!!

त्याकाळी घरात फोन असणे ही मोठी बाब समजली जायची. (त्यातल्या 'मोठे'पणाशी माझा काही संबंध नव्हता, आजही नाही!). त्याकाळी फोनसाठी वेटिंग लिस्ट असायची. एक - दोन दिवसात फोन जोडण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आणि एक दिवस घरी फोनची ती "टिपिकल रिंग" वाजली! तुम्हाला सांगतो, पहिल्या बाळाचा "ट्याहा" ऐकण्यासाठी नवरा-बायको जेवढे उत्सुक असायचे नां तेवढी उत्सुकता ती रिंग ऐकण्यासाठी असायची!! आणि टेलिफोन नंबर मिळाला 2605916...!! "आधी 0217 लावायचा बरंका. तो सोलापूरचा एस टी डी कोड आहे" असं आमच्या नातेवाईकांना सांगायचो. हे सांगतानाही मोठी गंमत वाटायची. टेलिफोनच्या रिंगची कानाला सवय लागेपर्यंत मधूनच दचकायलाही व्हायचं. नंतर मग कानही सरावले. रिंग वाजली की कुणाचा फोन असेल? अशी उगाच उत्सुकता तो उचलेपर्यंत असायची. 


हळुहळु "तो" आमच्या आयुष्याचा भाग झाला. मुलं बोलायला लागली की, तुझं नाव सांग, आई-बाबाचं नाव सांग...अशा प्रश्नाबरोबर आपला फोन नंबर सांग..म्हटलं की, दोन सहाशे पाच नऊशेशोला... असे बोबड्या स्वरातला नंबर ऐकायला मजा यायची. असं सगळ्याच घरांमध्ये घडत असेल नां? त्या फोनवर बोलताना प्रत्येकाची वेगळी स्टाईल असते. कुणाचा रिसिव्हर कानातून आरपार निघतो की काय असे वाटते, कुणी त्याला कानाशी लागूंही देत नाही, कुणाचा हात त्या रिसिव्हरच्या गोलगोल वायरीशी चाळा करत असतो. कित्ती नमुने!!


आम्ही एक-दोन भाड्याची घरं बदलत "स्वतःच्या" घरी पोहोचलो...तसा "त्याचा"ही प्रवास थांबला. मुलाच्या मुंजीमध्ये माझ्या मित्राने त्याला एक छानसा स्टँडही भेट दिला. आमच्या लग्नात रुखवतात आलेलं लोकरीचा रुमाल त्यावर झाकायचो. दरम्यानच्या काळात फोनच्या इन्स्ट्रुमेंटचे अनेक अवतार आले. काळा, पांढरा, निळा, उभा, चपटा... डिस्प्लेवाला, नॉनडिस्प्लेवाला ... कित्ती प्रकार!!  "टेलिफोन डिरेक्टरी" नावाचं एक बाड घरात असायचं. वरचे आणि खालचे पानं हमखास फाटलेली असायची. सहज जाता जाता तुमच्या ज्ञानात भर टाकतो, पहिली टेलिफोन डिरेक्टरी 1878 साली डिस्ट्रिक्ट टेलिफोन कंपनी ऑफ न्यू हेवन यांनी काढली. तब्बल 50 टेलिफोन धारकांची नावे त्यात छापलेली होती म्हणे! फोनवरचा "हॅलो" हा शब्द फोनचा जनक अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी पहिल्यांदा उच्चारला असे म्हणतात, हॅलो हे त्याच्या गर्लफ्रेंडच नाव होतं मार्गारेट हॅलो! पण ती दंतकथा असावी. ग्रॅहम बेल यांने  "अहोय" (Ahoy) या शब्दावर भर दिला होता. थॉमस अल्वा एडिसनने मात्र हॅलो हाच शब्द योग्य असल्याचे म्हटले होते. इतिहास गमतीशीर असतो.


आपण बोलतो... फक्त. तो शांतपणे ऐकत असतो, इकडेच तिकडं सांगत असतो. "फोन"ला सगळं माहिती असतं, त्याला सगळं कळतं! बोललेले शब्द तरी कळतातच, न बोललेले, ओठावर न आलेले शब्दही कळतात. उसळलेला हास्याचा फवारा, दबलेला हुंदका, अनावर कोसळलेलं रडू, मनात उमटलेली हास्याची अस्पष्ट लकेर... सगळं सगळं त्या छोट्याश्या चौकोनी डब्यात सामावतं. भले-बुरे, आनंदाचे, दुःखाचे कितीतरी प्रसंग यात बुडालेले असतात. उचंबळणारे, उधळणारे कितीतरी कारंजे यातून उडालेले असतात. माहितीचे, ज्ञानाचे कितीतरी शब्द यात साठलेले असतात. धीराचे, सांत्वनाचे, समजुतीचे चार शब्द यात दाटलेले असतात. कधी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, मित्रांच्या शुभेच्छा, सोबत्यानंचे प्रोत्साहन, लहानाचे पापे...खूप काही... न सांगता येण्याजोगं!!


कधी रुसवा, कधी फुगवा, कधी लटका... कधी निःशब्द लज्जा... कितीतरी भाव यात दडलेले!! कधी बटांशी चाळा, कधी त्या गोलगोल वायरीशी चाळा करत किती देवाण-घेवाण झाली असेल नां? खट खट खट करत न लागलेल्या, तुटलेल्या संवादाच्या अनेक अर्धवट कथा यात असतील. दिवसाच्या उन्हाचे चटके, रात्रीच्या चांदण्यांची शीतलता, पावसाची नॉस्टॅल्जीक रिपरिप... यात असेल का हो?
काकांच्या तब्येतीची चौकशी, अण्णांची शेतीची खबरबात, आत्याची विचारपूस, भैय्या-वहिनी, ताईंची नातवंडं, मामा, मावश्या, भाचे, भाच्या...सासुरवाडीला विसरून कसे चालेल? त्यांचेही फोन असणारच नां! सगळा गोतावळा.... त्या चौकोनी डब्यात सामावलेला! कौतुक, शाबासकी, थाप, काळजी, चिंता, प्रश्न, उत्तरं...धडधड, निश्वास, विश्वास... खात्री..असंख्य छटा! प्रत्येकाची वेगळी तऱ्हा. वेगळा ढाचा, वेगळा बाज.
शेजाऱ्यांचे निरोप, त्यांना बोलावणे, पुन्हा डायल करणे, त्यांचं अवघडलेपण, आम्ही नकळत आत जाणे...हे सगळं त्या फोन भोवती घडत होतं. तो बेटा स्थितप्रज्ञासारखा शांत, स्तब्ध ,निश्चल! "या महिन्यात बिल जास्ती आलं हो..." बायकोची तक्रार... मग कारणांचा शोध. कारणं सापडल्याचं समाधान. बिल वाढल्यापेक्षा ते का वाढलं, हा प्रश्न गहन असतो... बिल जागेवर न सापडणं, नेमकं मुदत संपली की हाताशी लागणं. शेवटची तारीख नेमकी चुकणं. दहा-वीस रुपयांचा भुर्दंड मात्र जीव्हारी लागतो. तरीही भरावंच लागतं. "तो" चालू तर आम्ही चालू. तो बंद तर आम्ही शांत. तो... फोन ठरवतो तुमचा दिवस. कधी मोरपिसासारखा हलका फुलका... तर कधी दगडासारखा..जागचा न हलणारा... किती गुंतत जातो नां आपण?
याला नां पूर्वी फक्त "फोन" एवढंच नाव होतं. पण मोबाईल आला आणि याचं नामांतर लँडलाईन झालं!! तरुणापासून हा दुरावत गेला. घराला वडीलकीची सावली मिळायची तेंव्हा हाच ज्येष्ठांचा आधार होता. वडीलकी संपत गेली तशी हाही निराधार झाला...!! "कर लो दुनिया मुठ्ठी में" म्हणत जग जवळ आलं, मात्र माणसं दूर झाली. "लँडलाईन" एक असमृद्ध अडगळ झाली! दिवसभर घरात दारच्या कुलुपाशिवाय कुणीच राहात नाही तर मग कशाला हवं ते लँडलाईन? 


झालं... एक दिवस बी एस एन एल ला अर्ज दाखल झाला आणि "दोनशे साठ एकोणसाठ सोळा"चं अस्तित्व संपलं!! हो... आता आमचा 0217- 2605916 हा नंबर खरंच अस्तित्वात नाही!! एवढ्या वर्षांची सोबत क्षणात संपवताना आतून हललं... खूप वाईट वाटलं.. दोन सजीवांना जोडणारा एक निर्जीव धागा तोडताना मन भरून आलं. पण काळाबरोबर जायला हवेच नां? 
वाईट याचं वाटलं, बी एस एन एल च्या माणसाने एकदाही विचारलं नाही...का बंद करताय फोन? आमच्यावर विश्वास नाही का? आम्ही चांगली सेवा देऊ, नका बंद करू! असं म्हणायला काय हरकत होती? एवढी किमान व्यावसायिकता तरी असायला हवी नां? कदाचित माझी अपेक्षाही चुकीची असेल!! असो, पण फायनली आमचा लँडलाईन आता अस्तित्वात नाही!

- माधव देशपांडे
90490 07450