कार-ट्रक अपघातात तरुणाचा मृत्यू; जखमीत महिला पोलीस अधिकार्‍याच्या पतीचा समावेश

कार-ट्रक अपघातात तरुणाचा मृत्यू; जखमीत महिला पोलीस अधिकार्‍याच्या पतीचा समावेश

सोलापूर / बेगमपूर : सांगोला येथून सोलापूरकडे येणार्‍या कारला भरधाव ट्रकने धडक दिली. या घटनेत कारमधील तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापूर - मंगळवेढा महामार्गावरील बेगमपूर(ता.मोहोळ) गावाजवळील स्टेट बँकेसमोर सोमवारी (ता.21) रात्री एकच्या सुमारास घडली. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

सुनील बनसिद्ध वाघमारे (वय 31, रा. टिळकनगर, मजरेवाडी, सोलापूर) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. गिरीश ब्रम्हदेव माने (रा.अरविंद धाम, पोलीस वसाहत, सोलापूर) व हर्षवर्धन मलिक सर्वगोड (वय 35, रा. गजाजन नगर, मजरेवाडी, सोलापूर ) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. यातील जखमी गिरीश हे सहायक पोलीस निरीक्षक हर्षा कांबळे-माने यांची पती आहेत. तसेच गिरीश हे रिपाई आठवले गटाचे कार्यकर्ते आहेत.

या अपघाताची माहिती कळताच कामती पोलीस व गावातील ग्रामसुरक्षा दलातील युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या दोघा गंभीर जखमी असलेल्या गिरीश आणि हर्षवर्धन या तरुणांना बाहेर काढून तत्काळ सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवून देण्यात आले. तर जागीच मृत्यू झालेल्या सुनील यास कारचा दरवाजा गॅस कटरने कापून बाहेर काढले.

याबाबत कामती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गिरीश माने व त्यांचे मित्र हे सोलापूरहून एका खासगी कामानिमित्त (एमएच 13 डीटी 1891) या कारमधून सांगोला येथे गेले होते. काम संपवून ते रात्री उशिरा परत सोलापूरला निघाले होते. दरम्यान सोलापूरहून मंगळवेढ्याच्या दिशेने सिमेंट घेऊन भरधाव वेगाने व चुकीच्या दिशेने निघालेल्या ट्रकने (एमएच 13 डी क्यू1270) महामार्गावरील बेगमपूर येथील स्टेट बँकेसमोर कारला समोरून जोरदार धडक दिली. यामुळे कारमधील चालकाशेजारी बसलेल्या सुनील वाघमारे याचा जागीच मृत्यू झाला.

गिरीश आणि हर्षवर्धन या दोघांच्या हात, पाय व डोक्याला जबर मार लागला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने महामार्गावरील दुभाजक तोडून ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिली. सोलापूरकडे निघालेली कार उलट दिशेला काही अंतर फरफटत गेली. घटनास्थळापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर ट्रक थांबला. घटनेनंतर ट्रक चालकाने तत्काळ पलायन केले. दरम्यान घटनेनंतर कांही वेळातच कामती पोलीस घटनास्थळी पोचले. मध्यरात्रीनंतरची वेळ असूनही महामार्गावर घडलेल्या या अपघाताच्या मदतीसाठी गावातील ग्रामसुरक्षा दलातील लखन ताकमोगे, अमर गोडसे, संजय चव्हाण, पपूल शेख, गजानन गुंडाळे या युवकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात कारचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात 10 ऑगस्ट रोजी माने कुटूंबीयांनी नवीन कार घेतली होती. या घटनेची सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षा कुमार कांबळे-माने (रा.अरविंदधाम पोलीस वसाहत सोलापूर) यांनी कामती पोलिसांत फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू दुधे पुढील तपास करीत आहेत.