भरदिवसा दोन तासात सव्वा दोन लाखांची चोरी!

भरदिवसा दोन तासात सव्वा दोन लाखांची चोरी!

सोलापूर : दवाखान्याला गेल्यानंतर कोणीतरी चोरट्याने बंद घर फोडून घरातील सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना दि.१७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान न्यू पाच्छा पेठ येथील चंदामामा अपार्टमेंट अशोक चौक सोलापूर येथे घडली.

याप्रकरणी राजेश्री अंबादास बोळकोटे (वय-४१,रा.न्यू पच्छा पेठ,अशोक चौक,सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी राजेश्री यांच्या पायाला सूज आल्याने त्या घराला कुलूप लावून अशोक चौक येथील दवाखान्यामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी औषध उपचार करून दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घरी परतल्या.

दरम्यान त्यांना आपल्या घराचे लोखंडी गेट उघडले असता दरवाजाची कोयंडा तूटलेला दिसला व कुलूप जवळील असलेल्या कुंडीमध्ये पडलेले दिसले. त्यावेळी त्यांनी घरांमध्ये जाऊन बेडरूममधील कपाटाची उघडून पाहिले असता कपाटातील एक लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याच्या बांगड्या,तीस हजार रुपयांची सोन्याची कर्णफुले,पंधरा हजार रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे कानातील झुमके,तीस हजार रुपये किमतीचे कानातील वेल असा मिळून एकूण दोन लाख २५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोसई बादोले हे करित आहेत.