नोकरांनी बँकेतून काढून घेतले नऊ लाख!

नोकरांनी बँकेतून काढून घेतले नऊ लाख!

वृद्ध महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

सोलापूर : सम्राट चौक महेशनगर परिसरात राहणार्‍या तारा जगदीश जाजू (वय 67) या वृद्ध महिलेच्या युको बँक खात्यातून तिघांनी नऊ लाख रुपये काढून घेतले. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सुदर्शन साका, अरविंद साका, निशिकांत बुलबुले अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनी मिळून संगनमत करून दोन धनादेश वापरून प्रत्येकी साडेचार लाख रुपये असे एकूण नऊ लाख रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हा प्रकार 23 ऑगस्ट 2016 रोजी घडला आहे. तारा जाजू यांच्या दुकानात काम करणारे सुदर्शन साका, अरविंद साका व निशिकांत बुलबुले यांनी पैसे काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. युको बँकेत जाऊन पैसे काढायला त्यांना कधीही सांगण्यात आले नाही. अथवा त्यांना धनादेशही कधीच दिले नव्हते. तरीही बँकेच्या दोन धनादेशाचा वापर करून त्यांच्या खात्यातून साडेचार लाख रुपये दोन वेळा असे एकूण नऊ लाख रुपये काढून घेतल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्याचा तपास हवालदार शेख करीत आहेत.