भारीच! मुलीचं असं स्वागत तुम्ही पाहिलंय का?

भारीच! मुलीचं असं स्वागत तुम्ही पाहिलंय का?

सोलापूर : सोलापुरातील दंतरोग तज्ञ डॉ. हर्षद वागज आणि डॉक्टर आशा वागज यांना नुकतेच कन्यारत्न झाले. वागज कुटुंबीयांनी मुलीचे जोरदार स्वागत करून सकारात्मक संदेश दिला आहे. 

डॉ. हर्षद आणि डॉ. आशा या दोघांना कुशाग्र आणि ओजस ही दोन मुले आहेत. आपल्याला मुलगी असावी असे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न नुकतेच पूर्ण झाले. डॉ. आशा यांना कन्यारत्न प्राप्त झाले. वागज कुटुंबीयांनी आपल्या या कन्येचे जोरदार स्वागत केले. स्वागतावेळी पायघड्या घालण्यात आल्या होत्या. सोबतच आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. रांगोळीतून ‘ज्या घरी मुलगी आली.. तिथे स्वतः लक्ष्मी आली..’ असा संदेश दिला आहे.

‘जितक्या भक्तीने व निष्ठेने आपण गौरींचे पूजन करतो तितक्याच श्रद्धेने व अंतकरणातून जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचे स्वागत होईल, तेव्हा तो प्रत्येक दिवस हा गौरी पूजनाचा दिवस असेल..’ असा महत्वपूर्ण संदेश लिहिलेला फलकही यावेळी लावण्यात आला होता.‌ यावेळी आजोबा दिलीप वागज, आजी अरुणा वागज, काका शुभम वागज यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

डॉ. हर्षद आणि डॉ. आशा यांनी मुलीच्या स्वागतानंतर सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘एखादी स्त्री हा प्रत्येक कुटुंबाचा पाया असते. जर त्या स्त्री चे जन्मांपासूनच स्वागत केले तर नक्कीच तो पाया भक्कम होत जातो. आमच्या घरी एक परी जन्माला आली आणि आमचे अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण झाले. त्या परीचे, आमच्या स्वप्नाचे आम्ही अभूतपूर्व स्वागत केले. मुलीसाठीची आमची तळमळ व इच्छेने आम्हाला हे सुख मिळवून दिले आहे. आम्ही खरेच भाग्यवान आहोत की आमच्या घरात कन्येचे पाऊल पडले. मुलीचे स्वागत करण्यासाठी खास HeForShe व Goal-5 ला सपोर्ट करत आम्ही स्वागताचे नियोजन केले. हा दिवस आमच्या आयुष्यात सुवर्णअक्षराने लिहिला जाईल यात शंका नाही. सजवलेली गाडी, या फुलांनी सजवलेल्या पायघड्या, उमटवलेले पहिले पाऊल हे सर्वच अभूतपूर्व होते. याच अभूतपूर्व क्षणांनी आमचा प्रवास सुरु झाला आहे.’ असे त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

वागज कुटुंबीयांच्या या आनंदी क्षणाचे सोलापूरकरांनी जोरदार स्वागत केले आहे. स्मार्ट सोलापूरकर परिवाराच्यावतीनेही वागज कुटुंबीयांचे हार्दिक अभिनंदन..