सोलापूरकरांनी एका दिवसात पाहिले डोंगर, लेणी, मंदिर!

सोलापूरकरांनी एका दिवसात पाहिले डोंगर, लेणी, मंदिर!

डॉ. मेतन फाउंडेशनतर्फे एक दिवसीय सहल

सोलापूर : डॉ. मेतन फाउंडेशनतर्फे सोलापुरातील ८० पर्यटनप्रेमींची धाराशिव लेण्या, रामलिंग मंदिर आणि माणकेश्वर मंदिर या तीन पुरातन पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी एक दिवसाची सहल यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती.

आपल्या सोलापूर आणि सोलापूर जवळ अनेक प्रेक्षणीय पुरातन वास्तू, स्मारके, किल्ले, मंदिरे, अभयारण्य, निसर्ग, धबधबे अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. ह्या प्रत्येक स्थळांना भेट देण्यासाठी एक किंवा दोन दिवसाची चांगली सहल होऊ शकते. या सहलीचा उद्देश आपल्या सोलापूर आणि सोलापूर जवळ असलेल्या स्थळांना भेट देण्यासाठी युवकांना आणि नागरिकांना प्रोत्साहन देणे असा आहे. एक सोलापूरकर म्हणून या स्थळांना भेट देऊन त्याबद्दलचा इतिहास आणि माहिती संपादन करणे हे आपले नागरिक म्हणून कर्तव्य आहे असा आमचा मानस आहे.

ही सहल सकाळी सोलापूरहून ६:३० वाजता सुरुवात होऊन प्रथम सोलापूरपासून ६० किमी अंतरावरील धाराशिव येथील बालाघाट डोंगररांगेत असलेल्या प्राचीन इ. स. सु ६०० ते ६५० या कालखंडातील बौद्ध, जैन आणि हिंदू ११ लेण्यांना भेट दिली. श्री जयराज किचारे यांनी सर्वाना या लेण्यांविषयी माहिती सांगितली. येथील भगवान पार्श्वनाथची अर्धपद्मासन काळ्या रंगाची प्रतिमा आहे हे येथील प्रमुख आकर्षण आहे. त्यानंतर येडशी येथील प्रसिद्ध रामलिंग मंदिराला भेट दिली. येथील निसर्गामध्ये तसेच सुंदर धबधब्यामध्ये सर्वानी आनंद लुटला. त्यानंतर बाराव्या दशकातील प्राचीन आणि कलात्मक श्री माणकेश्वर शिव मंदिराला आणि सटवाई मंदिराला भेट दिली. काळ्या खडकात कोरलेले, माणकेश्वरमधील शिव मंदिर त्याच्या भिंतींवर अप्रतिम कोरीव कलाकृतींनी घडविलेल्या सुंदर आणि सुबक मुर्त्या हे भारतीय संस्कृतीचा सुंदर नमुना आहे. हे सुंदर मंदिर विश्वरूपा या नदीच्या निसर्गरम्य  काठावर वसलेले आहे. श्री जयराज किचारे आणि डॉ. व्यंकटेश मेतन यांनी सर्वाना या मंदिराविषयी माहिती सांगितली. दुपारी सर्वानी वनभोजनाचा आस्वाद घेऊन सायंकाळी सोलापूरला पोहोचले. 

डॉ. मेतन फाउंडेशनने नजीकच्या काळात आपल्या सोलापूर जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी सहल काढणार आहे. या सहलीला सोलापुरातील ८० पर्यटनप्रेमींनी भाग घेऊन आनंद लुटला. हि सहल यशस्वी करण्यासाठी सोमेश्वर लवंगे, महेश बनसोडे, जयराज किचारे,अविनाश जोशी, सिद्धाराम सक्करगी,श्रीनिवास येले, राघवेंद्र मेतन, गिरीश मेतन यांनी परिश्रम घेतले.