सर्वोच्च शिखरावर घुमला विठ्ठलाचा जयघोष! 

सर्वोच्च शिखरावर घुमला विठ्ठलाचा जयघोष! 

eco friendly club sandhan valley kalsubai trek 2021

सोलापूर  : निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखरावर ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच निसर्गरम्य अशा भंडारदरा जलाशय परिसर आणि आशिया खंडातील दोन नंबरच्या सांदण दरीत भटकंती करण्यात आली. या उपक्रमात सोलापूर, पंढरपूर, मोहोळ, पुणे, पनवेल, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. 

16 डिसेंबर रोजी सर्व निसर्गप्रेमी चडचणकर ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसमधुन अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदारा जलाशयाच्या दिशेने रवाना झाले. तर पुणे, पनवेल आणि चिखली येथील सदस्य आपापल्या वाहनाने मार्गस्थ झाले. 17 डिसेंबर रोजी पहाटे सर्वजण अकोले तालुक्यातील मातोश्री लॉन या ठिकाणी फ्रेश झाले. चहा - नाश्ता झाल्यानंतर सर्वांनी लॉनवर मस्त झुंबा करून आनंद व्यक्त केला. 

उंचचउंच शिखरे आणि भंडारदरा जलाशयाचे विस्तीर्ण रूप पाहात सर्व निसर्गप्रेमी घाटघर येथील कोकणकडा परिसरात पोहचून उंचावरुन दिसणार्‍या निसर्गाचे दर्शन केले. काही वेळ भंडारदरा जलाशयाच्या पाण्यात उतरून आनंद लुटला. त्यानंतर सर्वजण साम्रद गावात दाखल झाले.दुपारच्या जेवणानंतर सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज की जय..., भारत माता की जय.. या घोषणा देत आशिया खंडातील दोन नंबरच्या सांदण दरीत ट्रेकिंगसाठी मार्गस्थ झाले. छोट्या-मोठ्या दगडांवरून तसेच कमरे एवढ्या थंडगार पाण्यातून वाट काढत निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेली सांदण दरी सर्वांनी पाहिली.

सायंकाळच्या सुमारास सूर्यास्त पाहण्यासाठी सर्व ट्रेकर्स सांदण दरीच्या वरच्या बाजूला पोहोचले. निसर्गाची गाणी गात सर्वांनी सूर्यास्त पाहिला. इतनी शक्ती हमे देना दाता.. या प्रार्थनेनंतर सर्वजण मुक्कामासाठी साम्रद गावाकडे रवाना झाले. 

साम्रद गावातील गाईड अतुल आणि राहुल बांडे यांच्याकडे मुक्कामाची छान व्यवस्था करण्यात आली होती. गावरान जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्वांनी शेकोटीच्या बाजुने ठिय्या मारला. गाणी आणि गप्पांची मैफील संपल्यानंतर सर्व ट्रेकर्सनी टेन्टमध्ये मुक्काम केला. 

18 डिसेंबर रोजी पहाटे लवकर उठून सर्वजण फ्रेश झाले. चहा - नाश्तानंतर सर्वोच्च कळसूबाई शिखराच्या ट्रेकिंगसाठी रवाना झाले. पांजरे गावातून ट्रेकिंगला उत्साहात सुरुवात झाली. वन विभागाने बसविलेल्या लोखंडी शिड्यांचा आधार घेत सर्वजण कळसुबाई शिखराजवळ पोचले. या ट्रेक दरम्यान अनेकांनी स्वतःची शारीरिक क्षमता तपासून पाहिली. महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाणी पोहोचून सर्वजण आनंदून गेले. छत्रपती शिवराय आणि पंढरीच्या विठ्ठलाचा जयघोष याठिकाणी करण्यात आला. सह्याद्रीतल्या खडतर वाटेवरून सर्वोच्च ठिकाणी पोहोचून अनेकांना गहिवरून आले.

कळसूबाई देवीला आणि निसर्गाला नतमस्तक होऊन सर्वांनी सोबत आणलेले दुपारचे जेवण केले. तिरंगा आणि भगवा ध्वज फडकावल्यानंतर बारी गावाच्या दिशेने उतरायला सुरुवात केली. या भटकंतीवेळी गाईड अतुल आणि अमोल यांचे सहकार्य महत्वाचे ठरले.

अकोले येथील मातोश्री लॉनवर अनिल धुमाळ, सुनील धुमाळ सर यांनी रात्रीच्या जेवणाची छान व्यवस्था केली होती. निसर्गरम्य अशा अकोले तालुक्यात पुन्हा येवू असा शब्द देवून सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. पुणे आणि बुलढाणा येथील ट्रेकर्स पहाटे आपल्या घरी पोचले तर सोलापूर आणि पंढरपूर येथील ट्रेकर्स सकाळी पोचले. 

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी उर्फ अजित कोकणे, पंढरपुरच्या सदस्या, पंढरपूर रनर्स असोसिएशनच्या सचिवा रेखा चंद्रराव, सोलापूरचे सदस्य प्रकाश आळंगे, सुधीर गावडे, संतोषकुमार तडवळ, विवेक वाले, दयानंद आडके, सोनाली थिटे यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च कळसूबाई शिखर, सांदण दरी आणि भंडारदरा परिसरातील भटकंतीमध्ये जयश्री आडके, ओंकार आडके, भीमन्ना अवजे, शुभांगी अवजे, राजेश्वर दासरी, बसवराज अरवी, प्रणव पवार, आनंद कोळी, वैशाली काशीद, श्रीया भोसले, श्वेता डोंबे, माधुरी जाधव, जयलक्ष्मी माने, अद्वैत माने, दीपाली सातपळ, सुचित्रा भाळवनकर, अन्मित्रा गोसावी, नीलिमा गोसावी, डॉ. पद्मश्री शेंडे, श्रावणी शेंडे, पल्लवी उपाध्ये, विधी उपाध्ये, राजनंदिनी फत्तेपुरकर, राजलक्ष्मी फत्तेपुरकर, वैष्णवी चव्हाण, स्वरूपा पाटील, अपूर्वा उपाध्ये, प्रशांत जाधव, प्रा. सतीश आवारे, प्रतीक अगावणे, प्रथमेश माने, प्रवीण जाधव, संकेत चंद्रराव, प्रथमेश लव्हेकर, अथर्व मोहोळकर, गुरुलिंग जोकारे, श्रेयस सलगर, पुणे येथून अश्विनी शिंदे, भाग्यश्री गणेशकर, मंजुळा इरशेट्टी, साईराज शिंदे, विनायक शिंदे, चिखली - बुलढाणा येथून विलास पर्‍हाड, अर्चना चेके, मीना शिंदे, उर्मिला बावसकर यांनी सहभाग नोंदविला.

राजकीय मंडळींचा उत्साही सहभाग 
पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष श्वेता डोंबे, शेगाव दुमाला येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच जयलक्ष्मी माने, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले यांनी या ट्रेकिंग उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला.

अद्वैत माने सर्वात पुढे
पंढरपूर येथून आलेल्या जयलक्ष्मी माने यांचा चिरंजीव अद्वैत माने (वय 10) हा सर्वोच्च कळसूबाई शिखरावर जाताना आणि खाली उतरतानाही सर्वात पुढे होता. सर्वांनी त्याच्या उत्साहाने कौतूक केले. सोलापूर येथून सहभागी झालेली वैष्णवी चव्हाण (वय 11) हिनेही सर्वांचा उत्साह वाढविला. 

ज्येष्ठांचा उत्साह
सोलापूर येथून सहभागी झालेले ज्येष्ठ सदस्य आनंद कोळी (वय 59), सुधीर गावडे (वय 54), पनवेल येथून आलेल्या मंजुषा इरशेट्टी (वय 50). 

वाहन चालकांची उत्साही सोबत 
सर्वोच्च कळसूबाई शिखर, सांदण दरी आणि भंडारदरा परिसरातील भटकंती अधिक आनंददायी होण्यासाठी, सह्याद्रीतल्या घाट वाटांमधून प्रवास करण्यासाठी चडचणकर ट्रॅव्हल्सचे ज्येष्ठ चालक पितांबर घोरपडे, सहकारी अतिश तांबे, पुणे येथून आलेले दत्ता अबनावे, बुलढाणा येथून आलेले निलेश धोंडगे यांचे सहकार्य मिळाले.