वासोटा, अजिंक्यतारा भटकंतीने घेतला जंगल अन् इतिहासाचा अनुभव!

वासोटा, अजिंक्यतारा भटकंतीने घेतला जंगल अन् इतिहासाचा अनुभव!

eco friendly club vasota ajinkyatara trek

सातारा : निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने (Eco Friendly Club) वासोटा जंगल ट्रेकिंग (Vasota Junle Trek) आणि किल्ले अजिंक्यतारा (Ajinkyatara Fort) भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गसंपन्न अशा कोयना परिसरातील शिवसागर जलाशय (Shivsagar) आणि वासोटा परिसरात भटकंतीने सर्वजण आनंदून गेले. या उपक्रमात सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा येथून निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. 

२४ फेब्रुवारी रोजी सर्व निसर्गप्रेमी चडचणकर ट्रॅव्हल्सच्या (Chadchankar Travels) लक्झरी बसमधुन सातारा येथील निसर्गरम्य अशा कोयना जलाशयाच्या दिशेने रवाना झाले. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे सर्वजण सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मौजे शेंबडी या गावामधील किसान साळुंखे यांच्या आरोही टेन्ट हाऊस (Arohi Tent House) याठिकाणी पोचले. पहाटे लवकर सर्वांनी फ्रेश होऊन चहा - नाष्टा केला. सकाळच्या सोनेरी किरणात दिसणारा कोयना जलाशय आणि सह्याद्रीची डोंगररांग पाहून सर्वजण भारावून गेले. 

दोन्ही बाजूस असणारी सह्याद्रीची डोंगररांग आणि मध्ये असणाऱ्या शिवसागर जलाशयातून बोटिंग करत वासोटा किल्ल्याकडे सर्वांचा प्रवास सुरु झाला. 
बोटीने प्रवास करत असताना उंचचउंच शिखरे आणि शिवसागर जलाशयाचे विस्तीर्ण रूप पाहात निसर्गाचे दर्शन केले. बोटिंग करत वासोटा येथील वनविभागाच्या सह्याद्री व्याघ्र राखीव येथील चेक पोस्टपर्यंत गाठले. 

घनदाट असलेल्या कोयना अभ्यारणातून (Koyana koyna Wildlife Sanctuary) वासोटा ट्रेक सुरु झाला. सुमारे दीड ते दोन जंगलातून ट्रेकिंग करत सर्वजण वासोटा किल्ल्यावर पोचले. वासोटा किल्ल्यावर पोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय..., भारत माता की जय.. या घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला. त्यानंतर सर्वांनी सोबत आणलेला डबा खाल्ला. 

दुपारच्या जेवणानंतर सर्वांनी वासोटा किल्ल्याची भटकंती केली. गडाच्या टोकावरून समोर दिसणारे शिवसागर जलाशयाचे विहंगम दृश्य व कोयनेचे अभयारण्य पाहताना सर्वांना आनंद झाला. किल्ल्यावर असलेले मारुती मंदिर, वाड्याचे भग्नावशेष, महादेव मंदिर, नागेश्वर सुळक्याचे दर्शन व दूरवर पसरलेल्या डोंगर-दऱ्या पाहताना वेगळाच आनंद मिळाला. वासोटा येथील गाईड लक्ष्मण साळूंखे आणि इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक सटवाजी कोकणे यांनी वासोटा किल्ल्याची ऐतिहासिक माहिती सर्वांना सांगितली. या भटकंतीमध्ये सर्वांना गवा, अजगर, माकड यासह विविध वन्यप्राण्यांचे दर्शन घडले.

संपूर्ण किल्ला फिरून झाल्यानंतर सर्वांचा सुरक्षितपणे वासोटा किल्ला उतरून परत बोटीने परतीचा प्रवास सुरु झाला. सायंकाळी शिवसागर जलाशय परिसरात सर्वांनी सूर्यास्ताचा आनंद घेतला. रात्री जेवणानंतर शिवसागर जलाशयाच्या शेजारी मस्त गाण्याची मैफिल रंगली. 

२६ फेब्रुवारी रोजी सकाळी चहा नाष्टा झाल्यानंतर इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी आरोही टेन्ट हाऊसचा निरोप घेतला. साळुंके कुटुंबियांना सोलापूरची चादर भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

शेंबडी गावातील दत्त मंदिरास भेट दिल्यानंतर बसने प्रवास करत सर्वजण सातारा येथे पोचले. दुपारचे जेवण सातारा शहरातील हॉटेल मलबेरी येथे झाले. 

दुपारच्या जेवणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज श्रीमंत उदयनराजे भोसले यांची इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी भेट घेतली. याठिकाणी कुशाग्र वागज याने शिवरायांची गारद दिली. मुळचे सोलापूरचे आणि सध्या सातारा पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेले विनायक मानवी यांच्या सहकार्यातून उदयनराजे महाराज यांची भेट घडली.

सायंकाळच्या टप्प्यात इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी किल्ले अजिक्यतारा येथे भटकंती केली. सातारा येथील इतिहास अभ्यासक गुरुराज अडागळे यांनी किल्ले अजिक्यताऱ्याची संपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. अजिंक्यतारा किल्ल्यावरील हनुमान मंदिर, महादेव मंदिर, महाराणी ताराबाई राजवाडा, दारू कोठार याठिकाणी सर्वांनी भेट दिली. 

संपूर्ण किल्ला पाहून झाल्यानंतर इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांचा सोलापूरच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु झाला. परतीच्या प्रवासात कोरेगाव परिसरातील हॉटेल सम्राट येथे सर्वांनी रात्रीचे जेवण केले. 

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वय सटवाजी (अजित) कोकणे, सदस्य मदन पोलके, माधव वडजे, संतोष घुगे, संतोष तडवळ, जकराया डवले, पल्लवी उपाध्ये, नीलिमा गोसावी, आशा क्षीरसागर, यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या निसर्ग भ्रमंतीमध्ये वेणुगोपाल कट्टा, अन्मित्रा गोसावी, विधी उपाध्ये, सारिका कासार, स्वाती भगरे, विजया नाईक,   विकास ढाले, सरस्वती ढाले, मयुरी ढाले, सोनाली डवले, डॉ. आशा वागज, कुशाग्र वागज, दीपाली गोन्याल, मोघना जोशी, वैशाली सरतापे, सुयश खानापुरे, सोनाली खानापुरे, अमरीश कंदीकटला, राजनी कंदीकटला, सार्थक खानापुरे, संस्कृती खानापुरे, निखिल कंदीकटला, नितुशा कंदीकटला, धीरेंद्र कपूर, प्राची कपूर, रुद्र कपूर, ॲड. मुर्गेश संख, अर्चना संख, आयुष संख, खुशी संख, संजीव मोरे, तेजस चाबुकस्वार, स्मिता गायकवाड, दयानंद अडके, ओंकार अडके, निलेश शहा, नंदकिशोर साळूंखे, आनंद कोळी, प्रशांत भोसले, विवेक वाले, आर्यन जाधव, राज जरे आदी सदस्य सहभागी झाले होते.

ही निसर्ग भ्रमंती आनंददायी होण्यासाठी चडचणकर ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ चडचणकर, बस चालक श्री. सुतार, सहाय्यक आतीश तांबे यांचे सहकार्य लाभले.