जलाशयांवर भंगलेल्या मूर्ती; ही गणरायाची विटंबना नाही का?

जलाशयांवर भंगलेल्या मूर्ती; ही गणरायाची विटंबना नाही का?

सोलापूर : वाईल्ड लाइफ काँझर्वेशन असोसिएशनचे अध्यक्ष, पर्यावरण अभ्यासक अजित चौहान यांनी आपल्या फेसबुकवर केलेली ही पोस्ट सर्वांना विचार करायला लावणारी आहे. जनजागृतीच्या उद्देशाने आम्ही ही पोस्ट स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

अजित चौहान यांची पोस्ट - 

काल नेहमीप्रमाणे डोणगाव रोड या भागांमध्ये निसर्ग भ्रमंतीसाठी गेलो असताना मला गाडीवरून एका शेतातील विहीर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काहीतरी मुर्त्या ठेवल्यासारखे दिसून आले. मी गाडी साईडला घेऊन आतमध्ये जाऊन पाहिले असता तिथे मला एक विहीर आणि त्या विहीरीच्या काठावरती विसर्जित पण न विरघळलेल्या अनेक भंगलेल्या गणेश मुर्ती दिसून आल्या. विहिरीमध्ये सुद्धा अर्धवट बुडालेल्या व आणि भंगलेल्या अनेक गणेशमूर्ती मला दिसून आल्या. हे दृश्य पाहून मला धक्काच बसला.

दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी सरकार, प्रशासनाने जलस्तोत्रांमध्ये गणेश विसर्जन करण्यास मनाई केल्यामुळे गणेश भक्तांनी यावर्षी विविध ठिकाणच्या शेतातल्या विहिरीकडे आपला मोर्चा वळविला आणि या ठिकाणी विसर्जन केले. परंतु शेवटी व्हायचे तेच झाले. ज्या शेत मालकीची ही विहीर होती त्या विहिरीमध्ये अचानकपणे एका दिवसातच गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्यामुळे मूर्ती पाण्यात साचल्याने त्यांची पाण्याची मोटर बंद पडल्याचे येथील शेतगड्याने सांगितले. आणि मोटरीला पाणी येण्यासाठी विहिरीत साचलेल्या मूर्ती विहिरीबाहेर काढाव्या लागल्याचे त्याने मला सांगितले. तसेच त्या मूर्तीचे रंग पाण्यात मिसळल्यामुळे तेथील पाणी गढूळ झाले आणि परिणामी हे पाणी येथील गुरांनी सुद्धा पिण्यास नकार दिल्याने समजले.

एकूणच काय तर आपण दरवर्षी इतकी जनजागृती करून सुद्धा लोक मोठमोठ्या पीओपीच्या मूर्ती घरी घेऊन येतात आणि त्या अशा जलस्त्रोतांत विसर्जित करून आपली जबाबदारी संपल्याचा आव आणून निघून जातात. परंतु विसर्जनाच्या दोन तीन दिवसानंतर आपण या ठिकाणी एक चक्कर मारली असता आपल्याला अनेक भंगलेल्या गणेशमूर्ती दिसून येतात. मग ही एक प्रकारची विटंबना नाही का? मित्रांनो आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत आहोत त्यातच पावसाचे प्रमाण वरचेवर कमी होत आहे आणि भविष्यात आपल्याला पाण्याची कमतरता जाणवणार आहे हे माहिती असूनसुद्धा आपण जुन्या रूढी, परंपरा, चालीरीती यांना चिटकून बसलेलो आहोत. आज हे प्रदूषित झालेले पाणी पिण्यास गुरांनी सुद्धा नकार दिला तर मग विचार करा भविष्यामध्ये जर असेच जल प्रवाह प्रदूषित होत गेले तर मग आपल्याला सुद्धा हेच केमिकलयुक्त गढूळ पाणी प्यावे लागणार आहे यात शंका नाही.

म्हणून तमाम गणेश भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे की, वर्षानुवर्षांपासून पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या प्रथांना फाटा देऊन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी यापुढे आपण मातीचे गणपती घरात स्थापन करूया व लाडक्या बाप्पांचे घरच्याघरी विसर्जन करून पर्यावरण रक्षणाची आपली सामाजिक जबाबदारी पार पाडू या. 
धन्यवाद !- अजित चौहान
(अध्यक्ष - वाईल्डलाइफ काँझर्वेशन असोसिएशन, सोलापूर)