सोलापूरला मिळाला ‘हिंमत’वाला अधिकारी; अपर पोलीस अधीक्षकांनी घेतला पदभार

सोलापूरला मिळाला ‘हिंमत’वाला अधिकारी; अपर पोलीस अधीक्षकांनी घेतला पदभार

सोलापूर : जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे असून लोकसंख्याही जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्याला आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही नूतन अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी दिली.

अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची रायगड येथे बदली झाली असून त्यांच्या जागी लातूर येथून जाधव यांंची नियुक्ती झाली आहे. मंगळवारी जाधव यांनी अपर पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून 2004 मध्ये ते निमलष्करी दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर 2008 मध्ये ते कृषी अधिकारी झाले. 2011 मध्ये त्यांनी नाशिक येथे पोलीस उपअधीक्षकपदाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनी बीड, भंडारा, धुळे या ठिकाणी पोलीस उपअधीक्षकपदावर काम केले. त्यांची बढती झाल्यानंतर त्यांनी नागपूर व लातूर येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम करुन ते सोलापुरात रुजू झाले.

ते म्हणाले, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस खात्याची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण काम करणार आहे. सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तन ही मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत अवैध हातभट्टी दारू बंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.