अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जुळे सोलापूर कृती समिती!

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जुळे सोलापूर कृती समिती!

सोलापूर : जुळे सोलापूर तथा हद्दवाढ कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. जुळे सोलापूर भागावर होणार्‍या अन्यायाला कृती समितीच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा निर्धार समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.1992 साली जसे जुळे सोलापूर तथा हद्दवाढ भाग सोलापूर महानगरपालिकेच्या कक्षेत आले, त्यावेळी पासुन ते आजतागायत येथील नागरिकांना मुलभुत नागरी सोयी सुविधा मिळवण्या करिता अनेक कष्ट सोसावे लागतात.

सोलापूर महानगरपालिकेला कर स्वरूपात सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारे तथा 102 नगरसेवकांपैकी एकुण 70 नगरसेवक निवडून देणार्या भागावर प्रशासन तथा लोकप्रतिनिधी यांच्यावतीने होणारा हा अन्याय आता येथील नागरिक सहन करणार नाही आणि येणार्‍या काळात व्यापक स्वरूपात जनआंदोलन उभे करुन जुळे सोलापूर तथा हद्दवाढ भागावर होणार्‍या अन्यायाला कृती समितीच्या माध्यमातुन वाचा फोडण्यात येणार असल्याची माहिती वेक अप सोलापूर फौंडेशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली.

महाराष्ट्र मुन्सीपल कौन्सिल, नगर पंचायत अँड इंडस्ट्रीयल टॉऊनशिप अ‍ॅक्ट 1965 प्रमाणे तीन लाख लोकसंख्या असलेल्या भागास महानगरपालिकेचा दर्जा प्राप्त होऊ शकतो, ह्या करिता व्यापक जनजागृतीची आवश्यक आहे. सोलापूरच्या जुळे सोलापूर तथा हद्दवाढ भागाच्या लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा आवाका लक्षात घेता सद्याच्या महानगरपालिकेच्या अपुर्या झोन अधिकारी, कर्मचार्‍यांची संख्या, मनुष्यबळ आणि साधन सामुग्रींचा विचार करता, सर्व भागास मुलभुत नागरी सोयी सुविधा पुरविण्यात सोलापूर महानगरपालिका निश्चित अपयश येत आहे असे अभ्यासपूर्ण मांडणी गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी केली.

जुळे सोलापूर तथा हद्दवाढ भागाला जाणिवपुर्वक केंद्र सरकारच्या विविध योजना जसे स्मार्ट सिटी मिशन आणि अमृत योजना मधुन वगळणे, महानगरपालिकेच्या मालकीचे मोकळे क्रिडा तथा उद्यानांवर लोकप्रतिनिधींच्या मार्फत कब्जा, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, नाट्यगृह आणि सिनेमागृह अश्या कैक मुलभुत नागरी सोयी सुविधांच्या अभावामुळे येथील नागरींकांमध्ये प्रचंड रोष असून जुळे सोलापूर तथा हद्दवाढ कृती समितीच्या वतीने येणार्‍या काळात व्यापक कार्य हाथी घेण्यात येणार असल्याची घोषणा शासकीय विश्रामगृह झालेल्या कृती समितीच्या बैठकीत झाला. बैठकीत सुहास भोसले, विद्या भगरे-भोसले, आनंद पाटील, प्रा.राहुल मांजरे, यशपाल चितापुरे, श्रीशैल तेलसंग, संदीप साळुंखे, अनंत कुलकर्णी, युसुफ पिरजादे, आनंद हुलगेरी, प्रसाद गोटे, संपदा जोशी, आरती काशीकर आदी उपस्थित होते.