रोखठोक भूमिका घेणार्‍या कंगनाविषयी हे वाचाच..!

रोखठोक भूमिका घेणार्‍या कंगनाविषयी हे वाचाच..!

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चित्रपट क्षेत्रात चालत असलेल्या शंकास्पद वशिलेबाजीवर (Nepotism) बरंच आरोप-प्रत्यारोपांच एक वादळ आज निर्माण झालेलं दिसतंय. अशा परिस्थितीत दस्तुरखुद्द कंगना रनौतने स्वतःची मांडलेली रोखठोक भूमिका ही एकूणच चित्रपट क्षेत्रातील सर्वच नवोदित कलाकारांना विचार करण्याजोगी गोष्ट आहे. तसेच या क्षेत्रात स्वतःला अतिशहाणं आणि अहंकार बाळगणाऱ्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वावर एक खूप मोठं प्रश्नचिन्हचं ?

स्वामी विवेकानंदांना गुरुस्थानी मानणारी कंगना रनौत आज स्वतःच्या मेहनतीवर चित्रपट क्षेत्रात एक नामवंत अभिनेत्री म्हणून जगप्रसिद्ध आहे. हिमाचल प्रदेशामधील 'सुरतगावं'' या छोट्याशा शहरातून मुंबईसारख्या ठिकाणी येऊन अवघ्या वयाच्या सतराव्या वर्षी "गॅंगस्टर" या तिच्या पहिल्याच चित्रपटात जबरदस्त भूमिका पार पाडत; तिनं स्वतःची एक नाविन्यपूर्ण ओळख उमटवलेली आपल्याला दिसते. स्वतः कंगना रनौतने सुरुवातीलाच या अभिनय क्षेत्रात करिअर करत असताना खूप काही संकटांना तोंड दिलेलं आहे, हे तिच्या आजपर्यंतच्या खडतर प्रवासावरून ठळकपणे आपल्याला समजतं.

खरंतर क्षेत्र कोणतंही असो आज घडीला देखील आपण कुठेही जा, तिथं पुरुष सत्ताच आपल्याला पाहायला मिळते. आणि याचमुळे आपल्या भारतीय संस्कृतीत अजूनही स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. मला वाटतं, कुठंतरी हे सामाजिक परिवर्तन झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने स्त्री-पुरूष समानता निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत कंगना रनौत सारख्या जिद्दी आणि रोखठोक स्त्रिया या समाजाच्या उरावर स्व-कर्तृत्वाने पुढे येत नाहीत, तोपर्यंत हे समाज विघातक चित्र असंच कायम राहणार.

अभिनेत्री कंगना रनौत स्वतः लेखक आणि दिग्दर्शक सुद्धा आहे. तिची सुंदरता, मेहनत, विचारांची प्रगल्भता, रोखठोक भूमिका हीच यशाची खरी गुरुकिल्ली ठरली आहे. आणि याच गोष्टींमुळे तिला आजपर्यंत भारताच्या "पद्मश्री पुरस्कारा" सहीत इतर अनेक नावाजलेल्या पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. एक स्त्री म्हणून या स्पर्धेच्या युगात तिनं मिळवलेलं यश आज चित्रपट क्षेत्रातील नवोदित कलाकारांना नेहमीच आदर्श राहील. एकूणचं तिच्या या यशस्वी प्रवासाला माझ्याकडून शुभेच्छा, कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी हा मनापासून लेखप्रपंच.

लेखक : शुभम मिसाळ