शिक्षकांनी घरात सुरु केले अन्नत्याग आंदोलन! कारण...

शिक्षकांनी घरात सुरु केले अन्नत्याग आंदोलन! कारण...

सोलापूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित मागण्यांसाठी  आज 4 जून 2020 रोजी एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन स्वगृही सुरु केले आहे. या आंदोलनात विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत.


या आहेत मागण्या - 1) अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दि 1 एप्रिल 2019 पासून 20 % वेतन अनुदान तसेच अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व वर्गतुकड्यावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दि 1 एप्रिल 2019 पासून 20% वाढीव वेतन अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करणे.2) अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढून अनुदानास घोषित करणे व अनुदान वितरित करणे.3) उच्च माध्यमिक शाळातील सन 2003 ते 2019 या कालावधीत प्रस्तावित नैसर्गिक वाढीच्या पदाना शासन मान्यता प्रदान करून वेतन अनुदान वितरित करणे. 4) टी इ टी ग्रस्त शिक्षकांचे माहे जानेवारी  2020 पासून रोखलेले वेतन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून मोकळे करणे .5) अपंग समावेशीत शिक्षण योजना (माध्यमिक स्तर ) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक व परिचरिकाना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थकीत व नियमित वेतन अदा करणे तसेच अन्यत्र समायोजन करणे .6) 8000 संगणक शिक्षक /निर्देशक यांना पूर्ववत सेवेत रुजू करणे.7)  रात्र शाळेला पूर्ण शाळेचा दर्जा देणे. या प्रमुख मागण्या संदर्भात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आहे.

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र पवार, प्रांत सदस्य बाबासाहेब काळे, विभाग कार्यवाह सोमनाथ राठोड, विभाग उपाध्यक्ष सुरेश राठोड विभाग कार्यालयमंत्री बाळासाहेब शिंगाडे, शहरअध्यक्ष मोहन पाटील, शहर कार्यवाह मारुती तोडकर, जिल्हाअध्यक्ष विनायक कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह परमेश्वर गायकवाड, जिल्हा कोषध्यक्ष आदम मुजावर, शहर कोषध्यक्ष बापू माने यांच्यासह शेकडो सदस्य सहभागी झाले आहेत. 

शिक्षकांचं हक्कासाठी ,सन्मानासाठी व न्यायासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आंदोलनात प्रतिसाद मिळाले आहे. शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे. 
- जितेंद्र पवार (महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार)