#माझीवसुंधरा : पुणे विभागात सोलापूर 1 नंबर!

#माझीवसुंधरा : पुणे विभागात सोलापूर 1 नंबर!

majhi vasundhara solapur news

मंद्रूप राज्यात दुसरे; जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव

सोलापूर : माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत यंदा सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना रविवारी जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.

 

मंद्रूपला (ता. दक्षिण सोलापूर) ग्रामपंचायत गटात राज्यस्तरीय दुसरा पुरस्कार मिळाला. ‘अमृत शहरे’मध्ये सोलापूर महापालिकेस विभागीय पुरस्कार मिळाला. तर मिलिंद शंभरकर यांना पुणे विभागातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरवण्यात आले. कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जर्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी उपस्थित होेते.

मंद्रूपच्या सरपंच कलावती खंदारे, माजी सरपंच विश्‍वनाथ हिरेमठ, ग्रामसेवक नागेश जोडमोटे,नोडल अधिकारी कृषी विस्तार अधिकारी सचिन चव्हाण यांनी स्वीकारला. वृक्षारोपण, सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापन, पक्षी धाम आदी संकल्पना गावात राबवल्या. त्याची दखल घेत पुरस्कार देण्यात आला.

सोलापूर महापालिकेने माझी वसुंधरा अभियानात नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्या. केगाव येथील ४८ एकर क्षेत्रावर लोकसहभागातून स्थानिक प्रजातींची झाडे लावली. गणेशोत्सवामध्ये शाडू मातीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करणे, घरीच मूर्तीचे विसर्जन, निर्माल्यापासून खतनिर्मिती, सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापन आदी अभिनव संकल्पना राबविण्यात आल्या. त्याची दखल घेऊन पुणे विभागात सोलापूर महापालिकेस पुरस्कार असून गुणांकणाामध्ये चाैथा क्रमांक आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त मच्छिंद्र घाेलप, पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर, तत्कालीन उपायुक्त तथा पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित होते.


Photo- माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पुणे विभागीय पुरस्कार स्वीकारताना महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, स्वप्नील सोलनकर, तत्कालीन उपायुक्त तथा पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे आदी.

मंद्रूपमधील युवकांनी एकत्रित येत विधायक उपक्रमांसाठी ‘आम्ही मंद्रूपकर अभियान’ सुरू केले. लोकसहभाग, रानवेध फाउंडेशनच्या मदतीने गावामध्ये पर्यावरण जागृती, वृक्ष लागवड संवर्धन करण्यात येते. माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत धुळवडीला गावातील हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता या पथकाने केली होती. तेथील झाडांना आळी करून पाण्याची व्यवस्था करण्यात आली. स्मशानभूमीतील राख गोळा करून त्या झाडांना घातली. स्थानिक प्रजातीची अनेक झाडं त्या ठिकाणी लावली. त्या ठिकाणी पक्षीधाम उभारून पक्ष्यांसाठी पाणपोई, चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बसवली आहेत. या अभिनव संकल्पनांचे जिल्हा प्रशासनाने स्वागत केले होते.


Photo- मंद्रूप ग्रामपंचायतीस मिळालेल्या राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना सरपंच कलावती खंदारे, ग्रामसेवक नागेश जोडमोटे आदी.

पुरस्कारात राज्यातील सर्व नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांच्या प्रतिनिधीना सन्मान पत्र व देशी झाडांच्या बिया देऊन सन्मानित करण्यात आले. जेणे करून येणाऱ्या पावसाळ्यात पुरस्कारर्थींनी या बियांची लागवड केल्यास राज्यातील पर्यावरन संवर्धनाला हातभार लागेल.


Photo- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पुणे विभागातील उत्कृष जिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले.

2 कोटींचे बक्षीस!

माझी वसुंधरा अभियानामध्ये सोलापूर महापालिका पुणे विभागात पहिल्या क्रमांकावर आणि राज्यात चौथ्या क्रमांकावर आली आहे. याबद्दल 2 कोटी रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

अधिकाऱ्यांचा पुढाकार

सोलापूर शहरात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यासाठी तत्कालीन उपायुक्त धनराज पांडे आणि पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर यांनी विशेष पुढाकार घेतला होता. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे सोलापुरातील सर्व पर्यावरणप्रेमी संस्था, कार्यकर्ते एकत्र आले. सोलापूर शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण यासह विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत.


#majhivasundhara