अरण्यऋषींच्या वाढदिवसाचा उत्साह; सोलापुरात विविध कार्यक्रम

अरण्यऋषींच्या वाढदिवसाचा उत्साह; सोलापुरात विविध कार्यक्रम
सोलापूर : पक्षी वनांचे वैभव आहे. पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रत्येकांनी याकामी आपले योगदान द्यावे, असे आवाहन अरण्यऋषी साहित्यिक तथा सेवानिवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांनी केले.

            सिद्धेश्वर वनविहार येथे अरण्यऋषी कक्षात श्री. चितमपल्ली यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तेथे वनविभाग तसेच समाजातील विविध मान्यवरांनी श्री. चितमपल्ली यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री.चितमपल्ली बोलत होते.

            राज्य शासनाच्या वन विभागामार्फत पक्ष्यांचे निसर्गातील  महत्त्व नागरिकांना कळावे, पक्ष्यांबाबत जाणीव वाढीस लागावी, यासाठी 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत पक्षी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा आज वाढदिवस आहे. तर जागतिक किर्तीचे पक्षीतज्ञ डॉ.सलीम अली यांची  12 नोव्हेंबर रोजी जयंती असते. यानिमित्ताने हा पक्षी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

            श्री.चितमपल्ली म्हणाले, पक्षी वनाचे वैभव आहेत. हे वैभव जतन करण्याबरोबरच पुढील पिढीकडे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सोपवायचे आहे. यासाठी पक्षी तज्ञ आणि निरीक्षकांनी नव्या पिढीला या क्षेत्राची आवड निर्माण व्हावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
            अलीकडील काळात समाजातील विविध स्तरातील लोक पक्षीनिरीक्षणाकडे वळले आहेत. पण त्यांनी अधिक संशोधक वृत्तीने काम करावे. निरीक्षणाच्या नोंदी ठेवाव्यात. या नोंदीच्या आधारे  पक्ष्यांबाबतच्या माहितीचा ठेवा आपण पुढील पिढीकडे सुपुर्द करु शकु, असे आवाहनही श्री. चितमपल्ली यांनी केले.
            यावेळी वन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या अरण्यऋषी कक्षाची श्री.चितमपल्ली यांनी पाहणी केली. सामाजिक वनीकरण विभागाच्या औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचीही त्यांनी पाहणी केली. त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
            यावेळी मुख्य वनसंरक्षक सुजय डोडल, वनसंरक्षक (वन्यजीव) रमेश कुमार, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक के.एल.साबळे, बाबा हाके, चेतन नलावडे,  संध्याराणी बंडगर आदी उपस्थित होते.
            यावेळी आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनिल शिनखेडे, डॉ.सुहास पुजारी, पद्माकर कुलकर्णी, डॉ.निनाद शहा, डॉ. व्यंकटेश मेतन, भरत छेडा, पप्पु जमादार यांच्यासह निसर्ग आणि पक्षी प्रेमी यांनी श्री. चितमपल्ली यांना शुभेच्छा दिल्या.

सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या शुभेच्छा


अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या ९० व्या वाढदिवस निमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या सोलापुरातील निवासस्थानी भेट देऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली हे अनेक वर्षे विदर्भातील जंगलात वनसाधना करुण सोलापुरच्या मायभूमीत कायमच्या वास्तव्याला आले आहेत  तिथली सारी जंगले त्यांनी पायाखाली घातली. त्यातले पक्षी, प्राणी, वृक्ष या साऱ्यांमध्ये दडलेलं एक अद्भूत जगणं त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलं. त्यांनी तब्बल एक लाख नव्या शब्दांचं योगदान दिलंय. त्यांचा पक्षीकोश, प्राणीकोश, वृक्षकोश यापूर्वी प्रसिद्ध झालाय. मत्स्यकोशाचे काम सुरू आहे. ही सारी कामे प्रचंड धडपडीची आणि भावी पिढ्यांसाठी अत्यंत मोलाची आहेत. २००६ साली सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ही होते.

आयुष्यातली कित्येक दशके जंगलात वनसाधना करणाऱ्या, जंगल प्रत्यक्ष जगलेला या अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा आज त्यांच्या यशवंत सुत मिल कंपाउंड येथील निवासस्थानी सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांनी वाढदिवस निमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या वनसाधनेचा, वनअभ्यास कार्याचा गौरव केला.

यावेळी माजी खासदार धर्मण्णा सादुल, जेष्ठ नेते दत्ता सुरवसे, जे जे कुलकर्णी वकील, मारुती कटकधोंड, श्रीनिवास चितमपल्ली यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन फाऊंडेशनची स्थापना

मराठी साहित्याला तब्बल एक लाख शब्दांची देणगी देणारे व आपले संपूर्ण आयुष्य वने, अरण्ये व जंगलांमध्ये व्यतित करून अनेक संशोधनाचे जनक असलेले अरण्यऋषी मा. श्री. मारुती चित्तमपल्ली सर विदर्भातील वनविभागाच्या आपल्या 40 ते 45 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सोलापुरात वास्तव्यास आले. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी पक्षी, वनस्पती, प्राणी यांची खडानखडा माहिती घेतली. त्यामुळे त्यांना "निसर्गवेडा" अशी बिरुदावली मिळाली.
▪️ऑक्टोबर महिन्यातच ते सेवामुक्त होऊन आपल्या मायदेशी म्हणजे सोलापूरला परत आले. सोलापूरमध्ये त्यांच्या पुतण्याकडे आल्यानंतर वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन फाउंडेशन, सोलापूर या निसर्गासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे सदिच्छा भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना एक झाडाचे रोप व छायाचित्र फ्रेम भेट स्वरूपात देण्यात आले. यावेळी चित्तमपल्ली सरांनी आपल्या कारकीर्दीत घडलेल्या अनेक घटनांना उजाळा दिला. वन्यप्राणी असो वा वनस्पती यावरील लिखाण, विद्यार्थ्यांना शिकवणी याबद्दल आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.
▪️सेवामुक्ती नंतरही ते एवढ्यावरच न थांबता जगासाठी अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या वृक्ष कोश या विषयावर ते सोलापुरात राहून काम करणार आहेत ही आपण सोलापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन फाउंडेशन, सोलापूरची टीम भेटायला गेल्यानंतर त्यांनी या संस्थेच्या सदस्यांचे अनुभव व छायाचित्र याद्वारे संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळेस संस्थेतर्फे काढण्यात आलेल्या छायाचित्रकारांचे अनेक फोटो पाहून त्यांनी त्याचे कौतुक केले व पक्षीनिरीक्षणासोबतच त्याच्या नोंदी करणे व त्या नोंदी साहित्य स्वरूपात भावी पिढीला उपलब्ध करून द्यावे अशी सूचना त्यांनी यावेळी आवर्जून केली. तसेच सोलापुरातील जैव विविधतेचे संवर्धन आणि संरक्षण होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 
▪️यावेळी वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन फाऊंडेशन, सोलापूरचे शिवानंद हिरेमठ, संतोषभाऊ धाकपाडे, अजित चौहान, महादेव डोंगरे, सुरेश क्षिरसागर, विनय गोटे, रत्नाकर हिरेमठ, मोनिका माने, अजय हिरेमठ, रेवण कोळी, शुभम बाबानगरे, मयांक चौहान, प्रशांत कांचन इ. सदस्य उपस्थित होते.

पंकज चिंदरकर यांनी भरवले प्रदर्शन
6 नोव्हेबर आजच्या प्रदर्शनाचे ठिकाण जुळे सोलापूर , डीमार्ट परीसर.पंकज चिंदरकर यांनी भरवले प्रदर्शनाचे उद्घाटन सौ सुवर्णा माने ,विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण सोलापूर व मा.श्री.रवींद्र माने कृषी उपसंचालक सोलापूर यांचे हस्ते करण्यात आले.
प्रदर्शन वेळ सकाळी ६ ते सकाळी ९ होती.प्रदर्शनास मोठयासंखेने नागरीकांनी भेट दिली.हे प्रदर्शन उदया दि.7 नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ६ ते सकाळी ९ वाजे पर्यंत राजस्वनगर, विनापूर रोड सिदधेश्वर वनविहार समोर भरणार असल्याचे पंकज चिंदरकर यांनी सांगीतले.