'प्रिसिजन'मुळे पंढरपूरच्या चिंचणीचा पाणीपुरवठा सौरऊर्जेवर!

'प्रिसिजन'मुळे पंढरपूरच्या चिंचणीचा पाणीपुरवठा सौरऊर्जेवर!

महाराष्ट्रातील 'रोल मॉडेल' होण्यासारखा प्रकल्प, 'मिनी महाबळेश्वर' असा चिंचणीचा नावलौकिक

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणार आहे. प्रिसिजन उद्योगसमूहाच्या आर्थिक पाठबळावर राबविलेला हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात रोल मॉडेल ठरू शकेल. मंगळवारी (दि. २२ जून २०२१) प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते सौरऊर्जा संचाचं लोकार्पण झालं.

सातारा जिल्ह्यातील कन्हेर धरणाची निर्मिती होत असताना पायथ्याशी असणारं 'चिंचणी' हे गांव विस्थापित झालं. १९८२ साली या गावाचं पुनर्वसन सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात करण्यात आलं. पंढरपूर-वेळापूर रस्त्यालगत एका छोट्याशा टेकडीवर हे गाव वसलं.

चिंचणीकरांनी दिलेल्या जागेतच हिरवळ फुलवण्याचा चंग बांधला. तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक झाडं लावत व ती उत्तम प्रकारे जोपासत चिंचणीने सोलापूर जिल्ह्यातील 'मिनी महाबळेश्वर' अशी ओळख निर्माण केली आहे. अत्यंत स्वच्छ, शांत, निसर्गरम्य अशा चिंचणीची दखल नुकतीच भारत सरकारच्या ग्रामविकास खात्यानेही घेतली.

'आदर्श ग्राम' होण्याकडे चिंचणीची वाटचाल वेगाने सुरू आहे. चिंचणीकरांची ही जिद्द पाहून प्रिसिजन समूहाने गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी सौरऊर्जा संच आपल्या सीएसआर फंडातून उपलब्ध करून दिला.

चिंचणीने प्रचंड मेहनत घेत निर्माण केलेल्या नैसर्गिक श्रीमंतीबद्दल पोलिस अधीक्षक सातपुते यांनी गावकऱ्यांचं कौतुक केलं. संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेनुसार चिंचणीची वाटचाल सुरू असल्याचं सांगत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी चिंचणीकरांची पाठ थोपटली. चिंचणीकरांनी इस्रायलप्रमाणे समूहशेतीचा पॅटर्न राबवावा, असं आवाहन डॉ. सुहासिनी शहा यांनी केलं.

चिंचणीकरांच्या वतीने लवकरच ग्रामीण पर्यटन सुरू करण्यात येणार असल्याचं मोहन अनपट यांनी प्रास्ताविकात सांगितलं. यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पोलिस निरीक्षक श्री. भस्मे, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्री. कटकधोंड, पिराची कुरोलीच्या सरपंच मुमताज शेख, उपसरपंच रणजित लामकाने, ग्रामसेवक मारुती भोसले, प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, समाधान काळे, चंद्रकांत पवार, शशिकांत सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

काय आहे 'चिंचणी'चा सौरऊर्जा प्रकल्प ?
प्रिसिजन उद्योगसमूहाने आपल्या सीएसआर फंडातून चिंचणीमध्ये सौरऊर्जा संच बसवला आहे. गावातील स्मशानभूमी आणि विहिरीपाशी मोठे सोलर पॅनल्स बसविण्यात आले आहेत. यामधून वीजनिर्मिती होऊन त्यावर संपूर्ण गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणा चालेल. नैसर्गिक ऊर्जास्रोत वापरल्यामुळे चिंचणीकरांचं वीजेवरचं अवलंबित्व खूप कमी होणार आहे. विशेष म्हणजे सोलापूरातील जोगेश्वरी सोलर सर्व्हिसेसचे इंजिनिअर ओंकार मोडक यांनी केवळ नऊ दिवसांत हा प्रकल्प पूर्ण केला.

निसर्ग पर्यटनाला वाव !
सोलापूर - मोहोळ - पंढरपूरमार्गे चिंचणीला जाता येतं. पंढरपूर - वेळापूर रस्त्यावर वाखरी - भंडीशेगांव - पिराची कुरोली नंतर उजवीकडे चिंचणीचा फाटा लागतो. चिंचणी हे ग्रुप ग्रामपंचायत असल्याने पिराची कुरोली अंतर्गत येतं. पर्यटकांचं स्वागत पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि गूळ-शेंगा देऊन केलं जातं. गावकऱ्यांनी श्रमदानातून वरदायिनी मातेचं सुबक मंदिर बांधलं आहे. ध्यान करता येईल इतकी शांतता इथं अनुभवता येते. वाचनालय, बैलगाडीतून फेरफटका, आट्यापट्या-सूरपारंब्या असे ग्रामीण खेळ असं छान वातावरण इथं अनुभवता येणार आहे. पर्यटकांसाठी एमटीडीसी अंतर्गत 'नाश्ता, न्याहारी व निवास' संकल्पना चिंचणीकर राबविणार आहेत. त्यासाठी दोन वातानुकूलित निवासी खोल्याही बांधण्यात आल्या आहेत. यामुळे निसर्ग पर्यटनाला चालना मिळणार असून 'मिनी महाबळेश्वर'चा फील घेता येईल.