पालखी महामार्गांच्या सुशोभीकरणासाठी तुमची काही सूचना आहे का?

पालखी महामार्गांच्या सुशोभीकरणासाठी तुमची काही सूचना आहे का?

पालखी महामार्गांच्या सुशोभीकरणासाठी तुमची काही सूचना आहे का?

सोलापूर : श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम या महान संतांच्या नावाने महाराष्ट्रात निर्माणाधीन असलेल्या दोन पालखी मार्गांचा सर्वंकष विकास व सुशोभीकरण यासाठी सूचना पाठवण्याचे जाहीर आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांच्या वतीने करण्यात आले होते. या प्रकल्प कामी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

www.palkhimarg.com या संकेतस्थळावर आपल्याला सूचना पाठवता येतील. महामार्गांसाठीच्या प्राप्त सूचनांच्या छाननीसाठी स्थापन करण्यात आलेल्या या तज्ज्ञांच्या समितीमध्ये डॉ. विश्वनाथ कराड, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, श्री रामदास फुटाणे, श्री राहुल सोलापूरकर, श्री सुहास चिटणीस या तज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे. संकेतस्थळावरील सूचनांची छाननी करून चांगल्या व निवडक सूचना प्रकल्पात समाविष्ट करण्याच्या उपक्रमासाठी तज्ज्ञांनी आपला वेळ द्यावा यासाठीचे निवेदन गडकरी यांच्यावतीने समिती सदस्यांना देण्यात आले आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्रं. ९६५) :

पुण्यातील हडपसरपासून मोहोळपर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग विकसित केला जात असून सुमारे २३४ किमी लांबीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असून सोयीसाठी दोन्ही बाजूंना स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आले आहेत. हा महामार्ग सासवड – जेजुरी – निरा – लोणंद – फलटण – नातेपुते – माळशिरस – वाखरी – पंढरपूर या गावांच्या हद्दीतून जातो. सुरक्षिततेसाठी काही गावांना बाह्यवळण रस्ते प्रस्तावित केले आहेत. यासाठी भूसंपादनासह अंदाजे एकूण ७ हजार २६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे श्री गडकरी यांनी म्हटले आहे.

श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्रं. ९६५ जी) :

पुणे जिल्यातील पाटसपासून तोंडले-बोंडलेपर्यंत श्री संत तुकाराम महाराज महामार्ग विकसित केला जात असून १३६ किमीच्या या प्रकल्पातही रस्त्याचे चौपदरीकरण व दोन्ही बाजूंना स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आले आहेत. हा मार्ग बारामती – निमगाव केतकी – इंदापूर – अकलूज – वाखरी या गावांमधून जातो. सुरक्षिततेच्या दृष्टीने काही गावांना वळणरस्ते प्रस्तावित केले आहेत. या महामार्गासाठी भूसंपादनासह एकुण खर्च ४ हजार ४१५ कोटी रुपये अपेक्षित असल्याचे श्री गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

या दोन्ही महामार्गासाठी एकूण ११ हजार ६८० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पूर्वापार चालत आलेली पालखी व वारी परंपरा यापुढील काळात अधिक सुकर व सोयीची होण्यासाठी या महामार्गची मोठी मदत होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. पालखी मार्ग सुशोभीकरणासाठी तुमच्याकडे काही सूचना असेल तर नक्की वर दिलेल्या संकेत स्थळावर कळवा.