पर्यावरण संवर्धनासाठी सरसावले मुलांसह पालक!

पर्यावरण संवर्धनासाठी सरसावले मुलांसह पालक!

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

सोलापूर : माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हॅपी टू हेल्प फाउंडेशन आणि इको फ्रेंडली क्लबने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडला.

या कार्यक्रमास महापौर श्रीकांचना यन्नम, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त, माझी वसुंधरा अभियानाचे प्रमुख धनराज पांडे, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. निनाद शहा, सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी कादर शेख, महापालिका पर्यावरण व्यवस्थापक स्वप्निल सोलनकर, जयहिंद फुड बँकेचे प्रमुख सतीश तमशेट्टी, इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक अजित कोकणे आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हॅपी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मदन पोलके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय इको फ्रेंडली क्लबचे अध्यक्ष परशुराम कोकणे यांनी करून दिला.

यावेळी मान्यवरांसमोर पर्यावरण संवर्धन या विषयावर मुलांनी छान सादरीकरण केले. पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीसाचेही यावेळी वितरण करण्यात आले. 

मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाची आवड निर्माण करण्यासाठी पालकांकडून प्रयत्न होत असल्याबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी समाधान व्यक्त केले. 

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सोलापुरात होत असलेल्या सकारात्मक बदलाची माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. स्पर्धेतील विजेत्यांना पर्यावरण बालदूत म्हणून नियुक्त करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.