...म्हणूनच ते 'वर्दीतले नेते' आहेत!

...म्हणूनच ते 'वर्दीतले नेते' आहेत!

सोलापूर : एरव्ही पोलिसांविषयी सकारात्मक बोलणार्‍यांची संख्या फारच कमी आहे. पोलिसांना नेहमीच बोलणे खावे लागते. चांगले काम करूनही अनेकदा कोणीच दखल घेत नाहीत. सोलापूरचे नगरसेवक, शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी आपल्याला भावलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याविषयी आपले मनोगत सोशल मीडीयावर व्यक्त केले आहे. 

सध्या शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेले सूर्यकांत पाटील गेल्या सात वर्षांपासून सोलापुरात कार्यरत आहेत. फौजदार चावडी पोलिस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलिस ठाणे या ठिकाणी त्यांनी सेवा बजाविली आहे. त्यांनी आपल्या सकारात्मक कार्यपद्धतीमुळे सोलापूरकरांशी वेगळे नाते निर्माण केले आहे.

नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी पोलिस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांचा वर्दीतील नेता असा उल्लेख केला आहे. धुत्तरगावकर यांनी पोलिस निरीक्षक पाटील यांच्याविषयी लिहीलेली पोस्ट खालीलप्रमाणे -  
वर्दीतला_नेता
भावलेले आधिकारी सूर्यकांत पाटील
खरंतर शीर्षकातील नेता हे संबोधन अलिकडे जास्तच बदनाम झालेलं आहे. पण, नेता म्हणजे, सर्वांना सोबत घेऊन, योग्य मार्गाने पुढे जाण्यासाठी प्रेरित करत राहणारा व्यक्ती असं मी मानतो. क्षेत्र कोणतंही असो अशा नेतृत्वगुणसंपन्न व्यक्ती समाजोन्नतीसाठी आवश्यकच असतात. असो.
पोलीस खात्यातील अधिकार्‍यांशी माझा जास्त जवळचा संबंध कधी आला नाही. मात्र, वीरेश प्रभू साहेब, स्वर्गीय अशोक कामटे साहेब, रवींद्र सेनगावकर, भूषणकुमार उपाध्याय आणि शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मडम या सोलापुरात सेवा बजावलेल्या अधिकार्‍यांची कार्यशैली छान वाटली. मात्र, पोलीस खात्यात ज्यांच्या कामाची पध्दत अधिक जवळून पाहायला मिळाली व प्रभावित केली असे अधिकारी म्हणजे सूर्यकांत पाटील साहेब. त्यांच्या विषयी लिहिण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती, पण योग जुळून येत नव्हता. साहेबांची बदली झाली तरीही या माणसाबद्दल आपण आपल्या मनातले विचार एकदा लिहायलाच हवेत असं वाटत होतं म्हणून उशीर झाला तरी आज हा लेखन प्रपंच..
सूर्यकांत पाटील साहेबांशी संपर्क वाढला तो टाळेबंदी (लॉकडाऊन) च्या काळात. खरंतर वयाची 55 वर्षे ओलांडलेल्या अधिकार्‍यांना ड्युटी न करता घरी बसण्याची मुभा होती. त्यातून कोवीड पॉझिटिव्ह झालेले सर्वाधिक पोलिस एमआयडीसी पोलीस ठाण्यातलेच होते. तरीही, वरिष्ठ पोलीस निरिक्षक म्हणून निधड्या छातीचे सूर्यकांत पाटील साहेब सर्वच आघाड्यांवर एक पाऊल पुढे होते. पोलीस ठाण्यातील दोन कर्मचार्‍यांना जीव गमवावा लागला जवळपास पंचवीस-तीस कर्मचार्‍यांना एकाचवेळी क्वारंटाईन व्हावं लागलं तरी पाटील साहेब डगमगले नाहीत. उलट त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल वाढवत जनतेलाही सोबत घेतलं आणि

अशक्य ते, सहज शक्य करुन दाखवलं
गवळी वस्ती मध्ये एकाच बोळात एकाचवेळी बारा जण कोवीड पॉझिटिव्ह निघाले, त्यानंतर त्याच भागात मुख्य रस्त्यावर पुन्हा एक रुग्ण आढळला त्यावेळी पहिल्यांदा सूर्यकांत पाटील हे व्यक्तिमत्त्व जवळून अनुभवाला मिळालं. रात्री उशीरा प्रतिबंधित क्षेत्र सील करण्याचे काम सुरु होतं. बरेच अधिकारी आणि पोलीस तिथं उपस्थित होते. मात्र, केवळ आदेश देऊन निघून न जाता स्वतः जातीने सहभागी होत बराकेटिंग व्यवस्थित होत आहे की नाही हे, ते स्वतः बघत होते. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांनी विश्रांती घ्यावी असं मी सूचवलं सुध्दा.. मात्र, उशीरा पर्यंत थांबून सहकाऱ्यांना ते प्रोत्साहन देत होते. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी केवळ पोलिसिंग व्यवस्थित केले असं नाही, तर सर्व समाज घटकाला सोबत घेऊन या संकटावर मात करण्याचा जणू मास्टर प्लानच बनवला. पोलीस मित्र, कोरोना वॉरियर्स, लोकप्रतिनिधी व समाजसेवक या सर्वांशी सहज संवाद साधत, काय काय करता येऊ शकेल याची शहानिशा करायचे आणि सर्वांना विश्वासात घेत एकानंतर एक योजना यशस्वी करायचे. पोलिसांचा धाक दाखवून, कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी या गोष्टी केल्या असत्या तर कदाचित त्यामध्ये थोडंफार यश आलंही असतं पण सर्वांना विचार पटवून देत, परिस्थितीची जाणीव करुन देत ज्या पध्दतीने हे संकट त्यांनी हाताळलं ते कौतुकास्पदच आहे. व्यापारी आणि फेरीवाल्या विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं. मन जिंकलेल्या अधिकार्‍यांने केलेले हे आवाहन असल्याने नागरिकांनी देखील स्वयंप्रेरणेने या कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदवला व संसर्गाची साखळी अधिक न वाढू देण्यात यश मिळाले. परिसरातील युवकांना सोबत घेत, या योध्द्द्यांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकांचा व को-मार्बिड व्यक्तींचा सर्व्हे त्यांनी करुन घेतला. ज्याचा उपयोग संभाव्य रुग्णांचा धोका कुठे होऊ शकतो हे जाणण्यासाठी झाला. त्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे अधिक सोपे झाले. कष्टकऱ्यांना धान्यवाटप करण्यासाठी देखील त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. शिवाय आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण अशा समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी धावपळीत देखील वेळ काढून आवर्जून उपस्थित राहणं आणि अशा कार्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देणं हा देखील पाटील साहेबांच्या स्वभावाचा भाग वाटला. ही सारी कामे पाहिल्यानंतर ते अधिकारी कमी आणि समाजाचे कुटुंबप्रमुख अधिक वाटले. म्हणूनच ते ’वर्दीतले नेते’ आहेत असा उल्लेख केला.
सोलापुरात येण्यापूर्वी काही आदिवासी भागात त्यांनी सेवा बजावलीय, तिथं सुध्दा पोलिसी खाक्या दाखविण्यापेक्षा माणुसकीच्या नात्याने तंटे मिटवले. आपसातील वादाचे रुपांतर संवादात आणि सुसंवादात होण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे तिथल्या लोकांनी सुध्दा खूप जीव लावल्याचे काही किस्से ऐकायला मिळाले.
पगारीपुरते कामावर हजेरी लावणारे अनेक असतात मात्र हे राष्ट्र माझं आहे, जे जे शक्य ते ते मी करेन अशी प्रामाणिक उर्मी असणारे सूर्यकांत पाटील साहेबांसारखे अधिकारी मोजकेच असतात. एमआयडीसी पोलिस ठाण्याची इमारत सोलापुरातील पोलिस आयुक्तालयाप्रमाणेच इको फ्रेंडली आहे. आता आतील फर्निचर देखील एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखे झाले आहे. दिवसभर नानाविध कटकटीचे विषय हाताळणाऱ्या पोलिसांचे मन प्रसन्न राहण्याकरिता या गोष्टी देखील निश्चित सहाय्यभूत ठरतील.
सूर्यकांत पाटील साहेबांची एमआयडीसी पोलीस ठाण्यातून वाहतूक शाखेला बदली झाली. बदली हा त्यांच्या ड्युटीचाच भाग आहे म्हणा.. भविष्यात आणखी कुठे बदली होईल कदाचित बढती/पदोन्नती मिळेल. पण, जिथे जातील तिथे आपल्या कामाचा वेगळा ठसा ते निश्चितपणे उमटवतील व जातील तिथे आनंद वाटत राहतील याची खात्री वाटते.
श्री सूर्यकांत पाटील सर, माझ्या प्रमाणेच असंख्य सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तुमच्या बद्दल आदर आहे. हा आदर वाढत रहावा असेच कार्य तुमच्या हातून घडत राहो आणि तुमच्या यशाची कमान सदैव उंचावत राहो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना !
- गुरुशांत धुत्तरगांवकर

#वर्दीतला_नेता #भावलेलेoआधिकारी #सूर्यकांतoपाटील खरंतर शीर्षकातील "नेता" हे संबोधन अलिकडे जास्तच बदनाम झालेलं आहे. पण,...

Posted by Gurushant Dhuttargaonkar on Friday, 20 November 2020