पोलिस अधिकार्‍याला मारहाण; भरतीवेळी कमी मार्क दिल्याचे कारण

पोलिस अधिकार्‍याला मारहाण; भरतीवेळी कमी मार्क दिल्याचे कारण

सोलापूर : सोलापुरात एका पोलीस अधिकार्‍याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मी तुमच्यामुळे पोलिस भरती झालो नाही.. मला भरतीमध्ये कमी मार्क दिले आहेत, असे म्हणत एका तरुणाने पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याला लोखंडी सळईने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच मोबाइलचे नुकसान केले.

पोलीस अधिकार्‍याला मारहाण केलेल्या तरुणाचे नाव कपिल बाजीराव खरात (वय 41, रा. प्लॉट नंबर 4, बनशंकरीनगर, जुळे सोलापूर) असे आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोडके (रा. म्हाडा कॉलनी जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. घोडके हे सोलापूर शहर पोलिस दलात अधिकारी म्हणून काम करतात. हा प्रकार 5 सप्टेंबर रोजी जुळे सोलापूर बनशंकरीनगर जवळ झाला आहे.

अविनाश घोडके व त्यांचा मित्र दुचाकीवरून जुळे सोलापूर प्रसादनगर येथील एक घर जागा विक्री करण्याच्या कामानिमित्त जात होते. त्यावेळी त्यांची दुचाकी अडवून कपिल खरात याने मी तुमच्यामुळे पोलिस भरती झालो नाही. तुम्ही मला पोलिस भरतीमध्ये कमी मार्क दिले आहेत, असे म्हणून लोखंडी सळईने छातीवर मारण्याचा प्रयत्न केला. तसेच मानेजवळ मारहाण केली. सळईने जिभेवर मारल्याचे तसेच मोबाइल फोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार दीपक उपासे तपास करत आहेत.