रेमडेसिव्हीर इंजेक्शनची किंमत माहितीय का?

रेमडेसिव्हीर इंजेक्शनची किंमत माहितीय का?

मेडिकल चालकांना किमती आणि साठा दरफलकावर लावण्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि औषधांचा साठा मुबलक असला तरी औषध दुकानदारांनी किंमती आणि साठा दरफलकावर लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अन्न व औषध प्रशासन अधिकारी व सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, अन्न आणि औषध प्रशासनाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त नामदेव भालेराव, केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष बसवराज मणुरे, माजी जिल्हाध्यक्ष कय्युम इनामदार, उपाध्यक्ष सिद्धेश्वर घाळे, सचिव राजशेखर बारोळे, हुमा मेडिकलचे संचालक यासीर शेख उपस्थित होते.

हुमा मेडिकलसमोर रेमडेसिव्हिर इंजेक्शन संदर्भात लावलेला फलक -

औषध आणि इंजेक्शनबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश श्री. शंभरकर यांनी श्री. भालेराव यांना दिले.

बैठकीमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता, वाढती रुग्ण संख्या आणि इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत सखोल चर्चा झाली. इंजेक्शन उपलब्ध असणाऱ्या औषध दुकानदाराचे नाव वृत्तपत्रांमध्ये जाहीर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी औषध संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. मणुरे यांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शन कंपन्यांकडून मागणीच्या ३० ते ४० टक्के पुरवठा होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. औषध विक्रेते एमआरपीपेक्षा कमी किमतीत विक्री करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

रेमडेसिव्हीर इंजेक्शन जिल्ह्यातील सर्व कोविड  सेंटरच्या औषध दुकानांमध्ये मिळतील. तसेच हुमा मेडिकल स्टोअर्स, सात रस्ता सोलापूर, नागपार्वती फार्मसी, सोलापूर आणि धन्वंतरी मेडिकल स्टोअर्स, पंढरपूर या दुकानात इंजेक्शन मिळतील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले.

कोरोनामुळे सगळेच तणावाखाली आहेत. अशा काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची काही प्रमाणात का होईना मदत व्हावी म्हणून आम्ही हुमा मेडिकलच्यावतीने रेमडेसिव्हिर इंजेक्शनवर सवलत दिली आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घाबरुन न जाता सकारात्मक रहावे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फलक लावून दररोज मेडिकलसमोर रेमडेसिव्हिर इंजेक्शनची माहिती अपडेट करीत आहोत.
- यासीर शेख, 
संचालक, हुमा मेडिकल