सार्वजनिक काकांनी सोलापूर अन् बार्शीतही केली होती सार्वजनिक सभेची स्थापना..

सार्वजनिक काकांनी सोलापूर अन् बार्शीतही केली होती सार्वजनिक सभेची स्थापना..

स्वदेशी आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या सार्वजनिक काकांनी आपल्या सोलापूर आणि बार्शीतही सार्वजनिक सभेची स्थापना केली होती. आज सार्वजनिक काकांचा स्मृतीदिन आहे, यानिमित्त बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक राहुल पालके यांनी लिहीलेला हा लेख..

१९ व्या शतकाच्या अखेरच्या काळात हिंदू, ट्रिब्यून, बंगाली, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे कार्य सुरु झाले.इंग्रजी सत्तेच्या काळात महाराष्ट्रात विविध संघटना स्थापन झाल्या होत्या. त्यामध्ये डेक्कन असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, इस्ट इंडिया असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, ठाणे असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा इ. राजकीय संघटना व संस्था यांचा समावेश होता. पुणे येथील पर्वती संस्थानाच्या पंचकमिटीचा गैरकारभार व आर्थिक भ्रष्टाचार संपविणे हा पुणे सार्वजनिक सभेचा उद्देश होता.पंचाची अरेरावी व मनमानी यामुळे गणेश वासुदेव जोशी यांचे मन दुखावले. त्यांनी पंचकमिटीच्या कारभारात लक्ष दिल्यामुळे पर्वती संस्थानाला सरकारकडून वार्षिक अनुदान सुरू झाले. याच कारणासाठी त्यांनी निवासस्थानी सभा बोलाविली. ग. वा. जोशी यांनी  सार्वजनिक सभेची स्थापना २ एप्रिल १८७० रोजी पुणे येथे केली. सनदशीर मार्गाने काम करणाऱ्या या राजकीय संघटनेचे पहिले चिटणीस म्हणून त्यांनी कार्य पाहिले. लोकांना संघटित व जागरूक करून  राजकीय, आर्थिक व औद्योगिक स्वरूपाची महत्त्वाची कामे त्यांनी सुरू केली.या सभेला लोकांनी प्रतिसाद दिल्यामुळे १८७५ पर्यंत  सातारा, वाई,कराड, वाई , धारवाड, भिवंडी, नाशिक, सिन्नर,अहमदनगर, सोलापूर, बार्शी या ठिकाणी या सभेच्या शाखा स्थापन झाल्या होत्या. या परिषदेत संस्थानिकही सामील झाले होते. या सभेची सूत्रे राष्ट्रवादी बुद्धिजीवींच्या हाती आली होती.जनता व सरकार यांमधील दुवा अशा स्वरूपाचे या संस्थेचे कार्य होते.

           नोकरीनिमित्ताने पुणे या शहरात ग. वा. जोशी आले. नोकरीत करीत असताना त्यांच्यावर कुभांड आल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली. कायद्याचा अभ्यास करून त्यांनी वकिलीची परीक्षा दिली व पुण्यात व्यवसाय सुरु केला. त्यांनी आद्य समाजसुधारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतले.  ‘फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील, यापेक्षा जास्त काही करणार नाहीत ना?’ असे निर्भय उद्‌गार त्यांनी यावेळी काढले होते. त्यांनी स्वदेशी लवादाची संकल्पना मांडली व त्याची अंमलबजावणी म्हणून पुणे येथे लवाद न्यायालयाची स्थापना झाली . सार्वजनिक क्षेत्रासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतल्यामुळे पुण्यातील लोक त्यांना 'सार्वजनिक काका' म्हणू लागले.

           पुणे सार्वजनिक सभेचे कार्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य सार्वजनिक काका आणि न्यायमूर्ती रानडे यांनी नेटाने केले. या सभेच्या कार्याची कल्पना व विचार न्यायमूर्ती रानडे यांचे असत तर त्या विचारांची अंमलबजावणीचे कार्य सार्वजनिक काकांचे असे. सार्वजनिक सभेच्या माध्यमातून न्यायमूर्ती म.गो.रानडे व ग. वा. जोशी यांनी स्वदेशीचा प्रसार केला. त्यासंदर्भात व्याख्यानेही दिली तसेच स्वदेशी वस्तूंची प्रदर्शने भरविली. सार्वजनिक काकांच्या प्रयत्नाने आग्रा येथे कॉटन मिल्सची सुरूवात झाली. त्यांनी स्वदेशीची शपथ 'सभेने दिलेले कोणतेही काम स्वशक्तीनुसार निःस्पृहपणे आणि भेदभाव न स्वीकारता पार पाडीन'घेतली. स्वदेशीचा वापर स्वतः केला व इतरांसही प्रवृत्त केले. इ.स. १८७७ मध्ये राणी व्हिक्टोरियाला 'हिंदुस्थानची सम्राज्ञी' हा किताब  अर्पण केला. यावेळेस ते हाताने विणलेला खादीचा वेश परिधान करून त्याठिकाणी हजर राहिले. सार्वजनिक सभेचे मानपत्र राणी व्हिक्टोरियला देण्यासाठी सार्वजनिक काका दिल्लीला गेले. या मानपत्रात त्यांनी हिंदी लोकांसाठी स्वावलंबी शिक्षणाचा आग्रह धरला.त्यासाठी प्रचार पुस्तिका छापली. स्थानिक उद्योगावर भर देत त्यांनी लोकांना स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यास प्रोत्साहित केले.
              गणेश वासुदेव जोशी यांच्या विधायक कार्यातून समाज सुधारणेच्या कार्याला गती मिळाली. त्यांनी जनतेचे प्रश्न व मागण्या सरकारपुढे मांडून त्यांच्या धोरणांत बदल घडवून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. महाराष्ट्रातील १८७६-७७ दुष्काळाच्याप्रसंगी त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळग्रस्त भागात प्रतिनिधी पाठविले. तसेच दुष्काळग्रस्त भागातील लोकांचे प्रश्न वृत्तपत्राद्वारे मांडून इंग्रज सरकारला उपाययोजना करण्यास सुचविले.दुष्काळावर उपाययोजना म्हणून त्यांनी दुष्काळ समिती नेमण्याचा आग्रह सरकारपुढे धरला. या समितीसमोर त्यांची साक्ष झाली व त्यांनी सरकारला विविध सूचना केल्या.
         लॉर्ड लिटन यांनी१८७८ मध्ये व्हर्नाक्युलर अॅक्ट पास वृत्तपत्रांवर निर्बंध आणले. वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणाऱ्या या कायद्याला सार्वजनिक काकांनी विरोध केला. त्याचप्रमाणे १८७९ मध्ये विश्रामबागवाडयाच्या पुनर्बांधणीच्या कार्यात सहभाग होता.
            ग. वा. जोशी यांच्या पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी 'स्त्री विचारवती सभे'ची स्थापना करुन सर्व जातींच्या स्त्रियांसाठी एकत्र येण्याचे माध्यम खुले केले. 
त्यांनी देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना करून विविध वस्तूंचे  साबण,शाई ,मेणबत्त्या, काडीपेटया व छत्र्या इ.वस्तू तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले.देशी हातमाग व स्वदेशी दुकानांना उत्तेजन दिले. 
         सार्वजनिक सभेच्या माध्यमातून काकांनी सनदशीर मार्गांनी चळवळ उभी करून समाजोपयोगी कामे सुरु केली.कृष्णराव भालेकर यांच्या सहकार्यानी त्यांनी ग्रंथालय सुरू केले. धनंजय कीर यांच्या मते, "सार्वजनिक काका हे देशभक्ती, कार्यशक्ती आणि कल्पकता यांचे एक मोठे चालतेबोलते असे प्रतीक होते. त्यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सभेचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले.भारतीय स्वातंत्र्याची पार्श्वभूमी निर्माण करताना अनेक समाजाभिमुख कार्यात व्यस्त असणाऱ्या ग.वा.जोशी यांचे हृदयविकाराने २५ जुलै १८८० रोजी निधन झाले. त्यांच्या स्मारकासाठी महात्मा फुले यांच्यासह विविध घटकांनी वर्गणी दिली.