तुम्हाला माहितीय का? सोलापुरातील लाल दगडांचे अष्टकोनी सिध्दगणेश मंदिर

तुम्हाला माहितीय का? सोलापुरातील लाल दगडांचे अष्टकोनी सिध्दगणेश मंदिर

सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात संपूर्णपणे लाल दगडात उभारलेले श्री सिध्दगणेशाचे मंदिर सोलापुरातील गणेशभक्तांपासून आजही अपरिचित आहे. बालगणेश स्वरुपातील उजव्या सोंडेच्या गणेशाची काळ्या पाषणातील मूर्ती सुंदर आणि मनमोहक आहे.

सोलापुरातील उद्योजक सिद्धेश्वर दुंबाळी यांनी अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सुनील नगरकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या स्वतःच्या जागेत 2013 श्री सिद्धगणेश मंदिर उभारले. म्हैसूर येथील श्री नागेश्वर स्वामी यांच्या उपस्थितीत श्री सिध्दगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. उजव्या सोंडेच्या श्री सिद्धगणेशाची मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथील शिल्प केंद्रात तयार केली आहे.

श्री सिद्धगणेशाचे मंदिर अष्टकोणी असून येथे भव्य प्रांगण आहे. या मंदिराची उभारणी करण्यासाठी खास गोकाक येथून लाल रंगाचा दगड मागविला होता. मंदिराची रचना व बांधकाम स्वतः सिद्धेश्वर दुंबाळी व त्यांच्या पत्नी जयश्री दुंबाळी यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. अशा प्रकारचे लाल दगडांचे मंदिर आणि काळ्या पाषाणातील बाल गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच पाहायला मिळते.गणेश जयंतीला श्री सिध्दगणेश मंदिरात मोठा कार्यक्रम असतो. वर्षभर गणेश चुतर्थीला गणेशाच्या दर्शनासाठी भाविक येतात. सोलापूर आणि परिसरातील गणेश भक्तांनी श्री सिद्धगणेश मंदिरास भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धेश्वर दुंबाळी यांनी केले आहे. 

अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील सुनील नगर रस्त्यावर महापालिका वसुली कार्यालयाच्या पुढे उद्योजक सिध्देश्वर दुंबाळी यांच्या खासगी जागेत श्री सिद्धगणेश मंदिर आहे. हे मंदिर उभारण्यासाठी 20 ट्रक लाल रंगाचे दगड गोकाक येथून मागविण्यात आले होते. मंदिर उभारताना कोठेही स्टीलचा उपयोग केला नाही. हे मंदिर सर्वांसाठी खुले आहे.