बरडे-देशमुख वाद; छत्रपती संभाजी चौकात प्रतिउत्तर! म्हणाले..

बरडे-देशमुख वाद; छत्रपती संभाजी चौकात प्रतिउत्तर! म्हणाले..

सोलापूर : शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यातील वाद वाढविण्याची शक्यता आहे. सोमवारी श्रीकांत देशमुख यांनी आपल्या शेकडो समर्थकांसोबत सोलापूर सोलापूर शहरात येवून हवा केली. त्याला बरडे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या आदेशाप्रमाणे आम्ही नागरिकांच्या हक्कासाठी लढत राहू. आम्हाला तिथे येऊ नका, तिकडे येऊन पाहतो अशी शिवसेना स्टाइलने दमबाजी करू नये. भाजप पक्षाला कुणी आडवू नये, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सोलापुरात आल्यानंतर म्हटले.

पंधरा दिवसांपूर्वी सोलापुरात भाजपचे आंदोलन झाले होते. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे फोन करुन भाजप जिल्हाध्यक्ष देशमुख यांना शिवसेना स्टाईलने दमबाजी केली होती. सोलापुरात येऊन असे कृत्य करू नका. मरिआई चौकात येऊन बघा, असे आव्हान बरडे यांनी दिले होते. श्रीकांत देशमुख हे सोमवारी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोलापूरला आले होते. छत्रपती संभाजी महाराज चौकात आल्यावर श्री. देशमुख म्हणाले, बरडे यांनी स्टंटबाजीचा प्रयत्न करू नये. जिल्ह्यातील बहुतांश आमदार, खासदार, महापालिका, जिल्हा परिषदेत भाजप सत्ता आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण संयम ठेवून. पक्षाच्या वतीने आंदोलन केले यात गैर काय, असा प्रश्न त्यांनी केला.

देशमुख यांनी गावात सत्ता आणून दाखवावी : बरडे
देशमुख यांच्या कृतीला उत्तर देताना शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले, पंधरा दिवसांपूर्वी भाजप पक्षाचे आंदोलन झाले. मुख्यमंत्री ठाकरे आम्हाला आदरणीय आहेत. मुख्यमंत्री हे पद संविधानिक व मानाचे आहे. त्यांचा अवमान करू नका असं मी म्हणालो. देशमुख हे मूळ भाजपचे नाहीत. ते तीन-चार पक्षांतून फिरून भाजपचे झाले आहेत. जवळा गावात त्यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणावे. त्यांच्यासोबत खासदार नाईक निंबाळकर आले होते, माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांचे वडील हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्याशी वैयक्तिक संबंध होते. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारे आहोत. देशमुख यांनी बोलण्यापेक्षा पक्षासाठी जास्त काम करावे असे ते म्हणाले.