तैलाभिषेकाने सिध्दरामेश्वर यात्रेस प्रारंभ

तैलाभिषेकाने सिध्दरामेश्वर यात्रेस प्रारंभ

Solapur Siddheshwar Yatra 

सोलापूर : ना सडा संमार्जन, ना रंगावली, ना भगव्यासह असणारा समतेची शिकवण देणारी पंचरंगी ध्वज, ना हलग्याचा कडकडाट, ना तुतारी सनई, ना बँड पथक, ना धनगरी ढोल, ना पांढरेशुभ्र पेहराव ,ना तो अष्टगंधाचा सुगंध,ना कमरेभवतीचा तो पटवडा, ना ही ती नंदीध्वजांच्या खेळण्यातील सुपाऱ्यांची हालचाल परंतु सागराच्या रूपाने प्रत्येक सिद्धेश्वर भाविकांच्या मना मनामध्ये निर्माण झालेल्या भक्तिरसाने ओथंबलेल्या सोन्नलगी नगरीमध्ये मंगळवारी (दि.12 जानेवारी) सिद्धरामेश्वराच्या यात्रेला 68 लिंगाच्या तैलाभिषेकाने (यणीमंज्जन) प्रारंभ झाला.

68 लिंग नगरप्रदक्षिणा मार्गावर बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र 
बोला हर्र श्री सिध्देश्वर महाराज की जय हर्र हर्र चा जयघोषाने वातावरण भक्तिमय झाली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भूकैलासातील  सोन्नलगीच्या सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेतील प्रमुख धार्मिक विधींना मंगळवारपासून प्रारंभ झाला.

हिरेहब्बू वाड्यात मानाच्या दोन्ही नंदीध्वजांचा पूजा

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला सुमारे साडेनऊशे वर्षांची समृद्ध परंपरा असून मानाच्या सातही नंदीध्वज हे योग दंडाचे प्रतीक आहेत. पहिला नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यात असून देवस्थानचा आहे तर  दुसरा नंदीध्वज कसब्यातील देशमुखांचा आहे. रूढी, प्रथा, परंपरेनुसार कसब्यातील हिरेहब्बू वाड्यात मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मानकरी राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या व दुसऱ्या या दोन्ही नंदीध्वज यांची विधिवत पूजा करण्यात आली.  त्यानंतर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर बाराव्या शतकामध्ये ज्या ठिकाणी पूजास्थानी बसत होते अशा पुजास्थानी हिरेहब्बू वाड्यातील सिद्धेश्वर पूजास्थान येथील शिवलिंगास नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी बृहन्मठ होटगी मठाचे अध्यक्ष धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्या सानिध्यात  मानकरी आमदार विजयकुमार देशमुख, विश्वस्त चिदानंद वनारोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, किरण देशमुख यांच्यासह सुदेश देशमुख, सुधीर देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिस बंदोबस्तमध्ये प्रमुख मानकरी व योगदंड घेऊन बग्गीतून 68 लिंगाच्या तैलाभिषेक करण्यासाठी सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. तर तैलाभिषेकला जाण्यासाठी मानकऱ्यासाठी  दोन बंदीस्त वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान सोमवारी रात्री मानाच्या नंदीध्वजाना साज चढविण्यात आला.

विजापूरवेस येथे पुष्पवृष्टी

योगदंड धारक मानकरी व श्रींची पालखी, मानकरी हे 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी निघालेले असतानाच हिरेहब्बू वाड्यापासून ते सिद्धेश्वर मंदिरा पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी झाली होती. लांबूनच भाविक त्यांचे दर्शन घेऊन मनोमन पूजा केली.  तर श्रींची पालखी विजापूर येथे आल्यानंतर मुस्लिम युवकांकडून श्रींच्या पालखी वर व योग दंडावर गुलाबांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी करण्यात आली.

सरकारी आहेर

सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला रूढी आणि प्रथा आणि परंपरा अबाधित असून, दरवर्षी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेत अक्षता सोहळ्याच्या आदी एक दिवस  सरकारी आहेर करण्याची परंपरा आहे. मानाचे सातही नंदीध्वज आणि योगदंड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या गेटजवळ आल्यानंतर सिद्धेश्वर प्रशाला जवळ कसब्यातील मानकरी देशमुख यांच्याकडून मानकरी हिरेहब्बू यांना सरकारी आहेर करण्याची प्रथा आहे. यंदाच्या वर्षीही या परंपरेत खंड पडू न देता कलेक्टर कचेरी जवळ आल्यानंतर मानकरी राजशेखर देशमुख, विजयकुमार देशमुख, सुदेश देशमुख, सुधीर देशमुख, सुदेश देशमुख यांच्याकडून यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू यांना ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या परंपरेप्रमाणे सरकारी आहेर करण्यात आला. दरम्यान पोलिस प्रशासनाने सुरुवातीला बग्गी व रथ थांबविण्यास विरोध करून सरकारी आहेर करण्यास मनाई केली. त्यामुळे काही काळ वादावादीचे प्रसंग निर्माण झाला परंतु नंतर प्रशासनाच्या परंपरा लक्षात आल्याने सरकारी आहेर विधीचा कार्यक्रम करण्यात आला. 

अमृत लिंगास तैलाभिषेक आणि विडा
सिद्धरामेश्वर महाराजाने बाराव्या शतकामध्ये सोलापूरच्या पंचक्रोशी मध्ये 68 शिवलिंगांची स्थापना केली आहे. कुंभार कन्येशी  सिद्धरामेश्वर महाराजांनी आपल्या हातातील योगदंडाशी प्रतीकात्मक विवाह सोहळा लावून दिला होता. या विवाह सोहळ्याच्या आधी एक दिवस सिद्धरामेश्वर महाराज  68 लिंगांना यांनी तैलाभिषेक करून अक्षता सोहळ्यासाठी निमंत्रण दिले होते. त्याच परंपरेनुसार साडेनऊशे वर्षानंतर आजही परंपरेनुसार अक्षता सोहळ्याच्या  आधी एक दिवस 68 शिवलिंगास तैलाभिषेक केला जातो. मंगळवारी  दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास बग्गीतून सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंड, योगदंड धारक मानकरी हिरेहब्बू, व अन्य मानकरी यांचा सिद्धेश्वर मंदिरातील मंदिर परिसरातील सिद्धेश्वर पहिले 68 लिंगातील पहिले अमृतलिंगाजवळ आल्यानंतर तैलाभिषेक करण्यात आला. अमृतलिंगास तैलभिषेक झाल्यानंतर मानकरी देशमुख यांच्याकडून मानकऱ्यांना विडा देण्यात आला. या विड्यात पान,सुपारी, गाजर ऊस यांचा समावेश होता.  अमृतलिंगास तैलाभिषक झाल्यानंतर सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरातील गदगीस मानकरी हिरेहब्बू यांच्याकडून विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर काही काळ  विश्रांती घेऊन पावणे एक वाजण्याच्या सुमारास उर्वरित शिवलिंगास तैलाभिषेक करण्यासाठी योगदंड धारक व मानकरी रथातून मार्गस्थ झाले. तर योगदंडाची वाहनातून प्रवास करत सिद्धरामेश्वर स्थापित 68 शिवलिंगाना तैलाभिषक करत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास योगदंड हिरेहब्बू वाड्यात पोहोचले.

चौकट
नंदीध्वज हे योगदंडाचे प्रतीक
सात नंदीध्वजांमध्ये पहिला नंदीध्वज सिध्देश्वर देवस्थानाचा, दुसरा देशमुख घराण्याचा, तिसरा लिंगायत माळी समाजाचा, चौथा व पाचवा विश्व ब्राह्मण समाजाचा तर सहावा व सातवा नंदीध्वज मातंग समाजाचा आहे. यंदाच्या वर्षी पोलीस प्रशासनाने नंदीध्वज  मिरवणुकीची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिरात एका ठिकाणी आणून ठेवावेत. तेथेच विधिवत पूजा होईल असे आदेश प्रशासनाने काढल्यानंतर नंदीध्वज मानकऱ्यांनी  नंदीध्वज आहे, त्या ठिकाणीच ठेवून विधिवत पूजा करण्याचा निर्णय घेतला.  त्यानुसार रूढी, प्रथा, परंपरेनुसार आहे, आहे त्या ठिकाणी नंदीध्वजांची पूजा केली.  नंदीध्वज हे योगदंडाचे प्रतीक आहेत. सिद्धरामेश्वर महाराज काय कवे कैलास या सूत्रानुसार आपल्या योगसिद्धी तुन सोलापूरला भूकैलास बनविले. सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडचे प्रतीक म्हणजे आज सामाजिक समरसतेची, समतेची सर्व समाज समाज एकोप्याची संदेश देणारे नंदीध्वज आहेत.

बैलगाडीची जागा  ट्रॅक्टरने घेतली
यात्रेमध्ये दरवर्षी मल्लिकार्जुन यांचे प्रतीक कावड, पंचरंगी ध्वज, भगवा ध्वज, केळीच्या खुंट, ऊस फुले बांधून सजविण्यात  आलेले बैलगाडी, पालखी सोबत भालदार-चोपदार, श्रींची पालखी, पांढरा पोशाख परिधान केलेले नंदीध्वज धारक डौलाने डोलनारेमानाचे सातही नंदीध्वजअसे भक्तिमय चित्र यात्रेतील प्रमुख सोहळ्यातील मिरवणुकीचा थाट असतो. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी दिली नाही. त्यामुळे योगदंड, योगदंड धारक मानकरी त्यांच्यासाठी एक बग्गी तर सिद्धरामेश्वर यांच्या पालखीसाठी रथाची ची व्यवस्था करण्यात आली. झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. रथ ओढण्यासाठी मिनी ट्रॅक्टर जोडण्यात आले होते. या ट्रॅक्टरला हे फुलांनी सजावट करण्यात आली होती. यंदाच्या या या सोहळ्यात बैलगाडी ऐवजी ट्रॅक्टर पाहण्यात आला.