सोलापूरच्या विमानतळांना ‘या’ महापुरुषांची नावे देण्याची मागणी!

सोलापूरच्या विमानतळांना ‘या’ महापुरुषांची नावे देण्याची मागणी!

solapur airport news

सोलापूर : सोलापुरातील होटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा चालू करावी ही मागणी होत असतानाच होटगी रोडवरील विमानतळास आणि बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळास महापुरुषांची नावे देण्याची मागणी पुढे आली आहे. 

होटगी रोड विमानतळाचे सिद्धेश्वर तर बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महात्मा बसवेश्वर असे नामकरण व्हावे, अशी मागणी गिरिकर्णिका फाऊंडेशनने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदिप सिंह पुरी यांच्याकडे इमेलद्वारे केली आहे. संपूर्ण जगाला समता आणि मानवतेचे धडे देणारे सोलापूरचे दोन महान महापुरुष ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचा यथोचित सन्मान होण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या संदेशाची रुजवण नव्या पिढी मध्ये होण्यासाठी होटगी रोड विमानतळचे सिद्धेश्वर तर बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महात्मा बसवेश्वर असे नामकरण व्हावे अश्या मागणीचे निवेदन गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदिप सिंह पुरी यांना इमेलद्वारे केली आहे.

नव्या पिढीने सोलापूरच्या ह्या दोन महापुरुषांचा इतिहास, त्यांनी केलेल्या महान कार्याची प्रेरणा घेऊन उत्तम राष्ट्र उभारणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे हाच नामकरण करण्यामागचा उद्देश आहे असे गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी स्पष्ट केले. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सोलापूर पुण्यनगरी आता कात टाकून विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.जागतिक वारसा स्थळ आणि पुरातनकालीन शहर हंपी नंतर सोलापूरचे आध्यात्मिक ब्रँडिंग होण्याच्या दृष्टीने सोलापूरच्या दोन्ही विमानतळांचे नामकरण केल्यास आध्यात्मिक पर्यटनात वाढ होऊन सोलापूरच्या विकासात भरिव योगदान मिळेल असा विश्वास सोलापूरातील तज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत. विमानतळांचे नामकरण केल्यामुळे सोलापूरच्या लौकिकात भर पडेल असा सुर सर्व क्षेत्रातुन येत आहे.