माहिती आहे का? लग्नात हुंडा म्हणून दिला होता सोलापूरचा भुईकोट किल्ला!

माहिती आहे का? लग्नात हुंडा म्हणून दिला होता सोलापूरचा भुईकोट किल्ला!

मुळचे सोलापूरचे पण नोकरीच्या निमित्ताने सध्या पुण्यात असलेले गडकोटप्रेमी विनीत दाते यांनी सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याविषयी लिहीलेले हे सुंदर लेखन प्रत्येकाने वाचायला हवे. सोलापुरात राहूनही बहुतांश लोकांना आपल्या भुईकोट किल्ल्याबद्दल माहिती नाही. अनेकांनी तर भुईकोट किल्ला आतून पाहिला देखील नाही. विनीत दाते यांच्या या लेखातून सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याची बरीच माहिती आपणास होणार आहे. या लेखासोबत जोडलेली छायाचित्रेही श्री. दाते यांनीच टिपलेली आहेत. 

सोलापूर हे माझं जन्म गाव. वयाची जवळपास २५ वर्ष सोलापुरात घालवली पण एवढ्या वर्षात कधीही स्वताच्या गावात असलेला भुईकोट किल्ला वेळ काढून पाहिला नाही. माझ्या लहानपणी कधीतरी किल्ल्याच्या बऱ्याचश्या भागात महापालिकेतर्फे "सावरकर उद्यान” / “हुतात्मा बाग" वसवली गेली. त्यावेळी आम्ही मित्र तिथं खेळायला जायचो आणि त्यामुळे तेवढाच काय तो किल्ला पाहिलेला. लहानपणी किल्ल्याचे बुरुज बांधण्यासाठी मुंजा आणि बाळंतीनीचा बळी दिला गेला वगैरे अश्या गोष्टी कानावर पडत असल्यामुळे घाबरून आम्ही किल्लाच्या अनेक भागात जातच नसू. वयाच्या साधारण २५ व्या वर्षी म्हणजे २००६ साली कामानिमित्त पुण्यात स्थायिक झालो आणि त्यानंतर मात्र सोलापूरात अगदी क्वचितच जाण होऊ लागलं. साधारण २०१० साली ट्रेकिंग आणि किल्ले पाहण्याचं वेड लागलं पण तरीही २०१८ साल संपेपर्यंत अनेकवेळा सोलापुरात जाऊन देखील किल्ला पाहण्याचा योग काही आला नाही. शेवटी गाववाल्या मित्रांनीच मनावर घेतलं की आता आपला किल्लेप्रेमी मित्र गावात आला की त्याच्याबरोबर निवांत किल्ला पहायचा आणि हा योग जुळून आला तो डिसेंबर २०१८ मधे.

सिद्धरामेश्‍वरांच्या वास्तव्याने पुनित झालेली भूमी म्हणून सोलापूरचा गौरव होतो. तर एकेकाळी सोलापूर हे गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होते. कोणत्याही शहराची किंवा ठिकाणाची काही खासियत असते. ही खासियत कधी खाण्याच्या पदार्थाची असते किंवा तिथल्या वस्तूंची असते किंवा मग तिथल्या वास्तूंची. सोलापूर शहर हे या तीनही बाबतीत प्रसिद्ध आहे. सोलापुरी चादर, शेंगाची चटणी, सिद्धरामेश्वरांच मंदिर आणि इथला बलदंड भुईकोट किल्ला अश्या अनेक गोष्टींसाठी हे गाव सर्वदूर प्रसिद्ध आहे. आणि हो यात "दाते पंचांग" हे नाव राहिलंच की. आमच्या पंचांगामुळे सोलापूरचे नाव तर पार सातासमुद्रापार पोहोचले. त्यात सोलापूर हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश (तेलंगणा) अश्या तिन्ही राज्यांच्या अगदी सीमेवर वसलेलं मिश्रभाषिक गाव. त्यामुळे इथला मराठी, कन्नड आणि तेलगु संमिश्र तिखट भाषेचा लेहजा पण वेगळाच. 'आला का बे', 'जेवला का बे', 'अबे कडू', 'असं नसतंय बे', 'अलावंऽऽऽ‘, ‘गेलावंऽऽऽ‘, ‘जेवलावंऽऽऽ‘, ‘बसलावंऽऽऽ‘, ‘खाल्लावं' असे शब्द कानावर पडल्याशिवाय माणूस अस्सल सोलापुरी वाटतंच नाही. असो, तर सोलापूर शहराबद्दल सांगत बसलो तर आणखी अनेक पान लिहिता येईल. त्यामुळे आज फक्त सोलापूरच्या किल्ल्याबद्दल.

तर सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात अप्रतिम कलाकुसरीने नटलेला एक भुईकोट किल्ला आहे. बाहेरील बाजूने भला मोठा खंदक (जो आता शहराच्या अतिक्रमणात बऱ्यापैकी नष्ट झाला आहे), खंदकाच्या आत साधारण ३० फुट उंचीची दुहेरी मजबूत तटबंदी आणि या तटबंदीमधे असणारे २२ पेक्षाही जास्त बलदंड बुरुज यामुळे किल्ला एकदम भक्कम व अभेद्य आहे.

हा किल्ला निश्‍चित केव्हा बांधला याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. बहामनी राज्याचा प्रधान महमूद गवान याने साम्राज्य विस्तारासाठी इ.स. १४६३ च्या सुमारास हा किल्ला बांधला असे म्हणले जाते. तर काहींच्या मते हिंदू राजाच्या काळात बांधलेल्या मूळ किल्ल्याभोवती महमूद गावान याने बाहेरून दुसरी तटबंदी बांधून किल्ला अभेद्य केला असे म्हणतात. पण एक मात्र खरे की इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा किल्ला अनेक राजवटीचे आश्रय स्थान होता. सर्वात आधी बहमनी सत्ता आणि त्यानंतर या बहनमी सत्तेचे तुकडे होऊन तयार झालेल्या आदिलशाही, निजामशाही व नंतर मोगल अशी अनेक सत्ता स्थित्यंतरे या किल्ल्याने पाहिली. पुढे हैदराबादच्या निजामाच्या आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात हा किल्‍ला गेला. शेवटी इ. स. १८१८ पासून १९४७ पर्यंत किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात होता. या ऐतिहासिक घटनांमध्ये एक गमतीशीर मजाही आहे. ती म्हणजे 'सोलापूरचा किल्ला' हा लग्नामध्ये हुंडा म्हणून देला गेलाय. आणि हे एकदा नाही तर चक्क दोन वेळा घडलं आहे.

अहमदनगर येथे बुऱ्हाण निजामशहा गादीवर होता. तर, विजापूर येथे इस्माईल आदिलशहा सत्तेवर होता. त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक विवाह संबंध घडवून आणण्यात आला. आदिलशहाच्या कन्येला बुऱ्हाण निजामशहाला देऊन हा लग्नसमारंभ धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. हा विवाह सोलापूरच्या किल्ल्यामध्ये झाला. त्यावेळी म्हणजे, इ.स. १५२३ मध्ये हा किल्‍ला विजापूरच्या ताब्यात होता. जावयाला हुंडा म्हणून 'सोलापूरचा किल्‍ला' देण्याचे आदिलशहाने जाहीर केले होते. पण विवाहानंतर आदिलशहाने हा किल्‍ला देण्याचे नाकारले. त्यातून पुढे निजामशहा आणि आदिलशहा यांच्यात युद्धही झाले. या युद्धात जावई निजामशहाचा पराभव झाला. दुसऱ्यावेळी इ.स. १५५२ मध्ये अहमदनगरची राजकन्या चांदबिबी अली आदिलशहाला देण्यात आली. तर अली आदिलशहाची बहीण हदिया सुलताना हिचा विवाह मुतर्जा निजामशहाशी करण्यात आला. तेव्हा मात्र कबूल केल्याप्रमाणे निजामशहाने हा किल्‍ला विजापूरच्या सुलतानाला हुंडा म्हणून दिला.

या किल्ल्याला हत्ती दरवाजा, शहर दरवाजा, खाती दरवाजा असे तीन भव्यदिव्य दरवाजे आहेत. किल्ल्यातील जवळपास सर्वच दरवाज्यांवर व येथील अनेक बुरुजावर शरभाचे शिल्पांकन केलेले दिसते. दरवाज्यावरील लोखंडी अणुकुचीदार खिळे, लोखंडी जाड पट्ट्या, दरवाज्यावरील झरोक्यांची रचना, नगारखाना, दरवाज्याच्या आतील प्रशस्थ पहारेकऱ्यांच्या खोल्या, घोड्याच्या पागा हे सगळं अगदी आवर्जून पाहण्यासारखं आहे. किल्ल्यात महाकाळ, पद्मावती, हनुमान व अष्टकोनी असे काही बलदंड बुरुज आहेत. यापैकी महाकाळ बुरुजाच्या बांधकामाच्या वेळी तो सतत ढासळत असल्याने बुरुज बांधताना मुंजा मुलाचा बळी देण्यात आला असे सांगतात. या बुरुजामध्येच मुंजोबाचे (महाकालेश्वर) आणि शनीश्वराचे मंदिर आहे. तसेच पद्मावती उर्फ दर्गोपाटील बुरुज बांधताना दर्गोपाटील घराण्यातील बाळंतीणीला आत्मसमर्पण करावे लागले आणि त्यानंतरच हा बुरुज बांधून पूर्ण झाला असे पूर्वापार सांगितले जाते.

किल्ल्यातील तटावर व बुरुजांवर जाण्यासाठी जागोजागी जिन्याची व्यवस्था आहे. या तटावर उभं राहिलं की मग या किल्ल्याचं दुहेरी तटबंदीचं अनोखं आणि रांगड रूप उलगडायला सुरुवात होते. बुरुजांवर असलेल्या तटबंदीच्या पाकळीची रचना (चर्या), त्यावर तोफांच्या माऱ्यासाठी केलेली जागा, तटबंदीमधे जागोजागी केलेल्या जंग्या, बुरुजांना जोडणा-या भिंती, त्यामधून बाहेर आलेले सज्जे आणि यावर दगडाचे मनोरे हे सारं काही थांबून पाहण्यासारखे आहे.

संपूर्ण किल्ल्याला या तटाच्या बाजूने फेरी मारता येते. त्यामुळे सगळी तटबंदी आणि बुरूज व्यवस्थित पाहता येतात. किल्ल्यात फारसी, पर्शियन, देवनागरी व मोडी लिपीतील अनेक शिलालेख पाहायला मिळतात. यातील एका शिलालेखात सोलापूरचा पूर्वीचा उल्लेख संदलपूर असा येतो. किल्ल्याच्या आत उत्खननात सापडलेले श्री. कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिर पाहायला मिळते. १९१९ साली तत्कालीन इंग्रज गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांच्या परवागीनंतर हे उत्खनन सुरु झाले. १४ कोरीव खांब, बाह्य भिंतीवर व्यालशिल्पे, नागशिल्पे, विविध फुलांची शिल्पे तसेच कामशिल्पे असलेले हे मंदिर अभ्यासकांनी जरूर पहावे. या मंदिराच्या उत्खननात सापडलेले दोन कन्नड शिलालेख व मोठे व्दारपाल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहलयात ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे किल्ल्यातील ३२ खांबी मस्जिद, गोड्या पाण्याची विहीर, बाळंतीण विहीर, ब्रिटिशांच्या मोहोर असलेल्या दोन तोफा या गोष्टी सुद्धा नक्की पहाव्यात.

सोलापूरचा किल्‍ला हा पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. किल्‍ला आणि त्याचा परिसर सुशोभित केलेला आहे. सोलापूर शहराच्या मध्यवस्तीत उभा असलेला हा दुर्ग सध्या इतर भुईकोटांच्या मानाने मोकळा श्वास घेत उभा आहे. याला कारण पुरातत्त्व विभाग आणि महानगरपालिकेने घातलेले लक्ष! तर आता पुन्हा कधी पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट या त्रिस्थळींच्या दर्शनासाठी सोलापूर शहरामार्गे गेलात तर गतवैभवाची साक्ष देणारा आणि आजही दिमाखात उभा असणारा किल्ला आवर्जून पहा.

- विनीत दाते
9960472514

विनीत दाते