कसला भारीय बे आपला भुईकोट; ‘इंटॅक’च्या किल्ला फेेरीला प्रतिसाद

कसला भारीय बे आपला भुईकोट; ‘इंटॅक’च्या किल्ला फेेरीला प्रतिसाद

solapur bhuikot fort heritage walk

सोलापूर : सुटीचा दिवस अन थंडीचा मोसम असूनही इंटॅक सोलापूर आयोजित किल्ला फेरीला आज उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कसला भारीय बे आपला भुईकोट किल्ला.. अशा भावना सोलापूरकरांनी व्यक्त केल्या.

एकट्या दुकट्या युवक युवती, मुलाबाळांना घेउन आलेले गृहस्थ, ज्येष्ठ नागरीक अन हुरडा पार्टीसाठी आलेले बाहेरगावचे पाहुणे सगळ्यांनीच भुईकोट किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्याचा योग साधला. 

करोनामुळे अनेक महिने बंद असलेला किल्ला अलिकडेच पर्यटकांसाठी खुला झाला. त्यानंतर ही पहिलीच वारसा फेरी इंटॅकने आयोजित केली. शालेय विद्यार्थी तसेच शिक्षक या फेरीत उत्साहाने सहभागी झाले होते, त्यांनी अनेक प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले.

इंटॅक समन्वयिका सीमंतिनी चाफळकर यांनी सुरूवातीला सर्वांचे स्वागत करून किल्ल्याचा इतिहास थोडक्यात सांगितला. खादिर दरवाजा, मधला दरवाजा तसेच महांकाली दरवाजा व बुरूज, कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिर, ३२ खांबी मशीद ही सर्व ठिकाणे माहिती ऐकत उपस्थितांनी पाहिली.

हनुमान बुरूज या किल्ल्यातल्या सर्वोच्च ठिकाणावरून दिसणारे सिध्देश्वर मंदिर व तळ्याचे निसर्गरम्य दृश्य व संपूर्ण सोलापूरचे विहंगम दृश्य पाहून वारसा फेरीची सांगता झाली. या फेरीस १०० पेक्षा जास्त वारसा प्रेमी उपस्थित होते. प्रा गीता जोशी, श्री पटवा, सुचेता थोबडे, रेवती डिंगरे, श्रीरंग रेगोटी, श्री माळी, प्रतीक पाटील, आर्कि दिव्या मोरे व सहकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. इंटॅक सह समन्वयिका श्वेता कोठावळे, पुष्पांजली काटीकर, सदस्य प्रा नरेंद्र काटीकर, रोहन होनकळस यांनी उपक्रम आयोजनात सहभाग दिला. पुरातत्त्व खात्याचे महादेव कांबळे यांनी सहकार्य केले.