#धक्कादायक : थांबा म्हणत असतानाही सापाला जिवंत जाळलं!

#धक्कादायक : थांबा म्हणत असतानाही सापाला जिवंत जाळलं!

सोलापूर : सोलापूर शहरात दुर्दैवी घटना समोर आली आहे. सापाला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर जवळील पोटफाडी चौक येथे दि. ८ डिसेंबर २०२० रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली. एका बिनविषारी सापाची अत्यंत क्रुर पध्दतीने हत्या करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सर्पमित्रांना कळाली. 

सर्पमित्र भीमसेन मनोहर लोकरे आणि त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.‌ परंतु त्या ठिकाणी पोचताच सर्पमित्रांना धक्काच बसला. कारण साप जखमी अवस्थेत असताना  त्याला उपचारासाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न सर्पमित्रांनी केला, परंतु सर्पमित्रांकडून साप हिसकावून घेवून तेथील रहिवासी तरुणांनी सापाला जिवंत जाळून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. 

सर्पमित्रांनी तरुणांना कायद्याच्या मार्गाने समजावून सांगिण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही ऐकून घेतले नाही. उलट त्यांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ केली. तु आम्हाला कायदा सांगु नको.. आम्ही असे १०० साप मारुन जाळु.. आमचं कोणीच काही वाकडं करु शकत नाही.. अशा अर्वाच्य भाषेत धमकावून तेथुन हाकलुन देण्यात आले. 

मी एकटा असल्याने काहीच करू शकलो नाही. त्या तरुणांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे, असे सर्पमित्राने सांगितले.