भित्तीचित्रांनी उजळले विद्यापीठाचे कॅम्पस! पहा कशी आहेत चित्रे..

भित्तीचित्रांनी उजळले विद्यापीठाचे कॅम्पस! पहा कशी आहेत चित्रे..

भित्तीचित्रांनी उजळले विद्यापीठाचे कॅम्पस! पहा कशी आहेत चित्रे..

कुलगुरूंची संकल्पना : प्रत्येक संकुलात थीमनुसार रंगकाम

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार विद्यापीठाच्या भिंतींवर भित्तीचित्रांनी अभ्यासक्रमांच्या थीमनुसार आकर्षक रंगकाम करण्यात आले असून यामुळे विद्यापीठाचे कॅम्पस नव्या रंगात व नव्या चित्रांत उजाळले आहे.

अर्थतज्ञ व चित्रकार असलेल्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी कोरोना व लॉकडाऊनचा सदुपयोग करत संकुलनिहाय विभागानुसार भिंतींवर आकर्षक चित्र काढण्याचे ठरवून ते सत्यात उतरण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. यामुळे प्रत्येक संकुलात विभागानुसार आकर्षक चित्रे रेखाटली आहेत. युवा चित्रकार पुष्कराज गोरंटला यांनी चित्र रेखाटली आहेत.

सामाजिकशास्त्रे संकुलात विभागानुसार पुरातत्वशास्त्रा विभागाचे पुरातत्त्व वस्तूंचे चित्र, पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांचे चित्र, ग्रामीण विकास विभागाचे चित्र, अर्थकारणाचे आकर्षक चित्रे रेखाटलेली आहेत. पर्यावरणशास्त्र संकुलात सुंदर चित्रे काढलेली आहेत. यामध्ये आदिमानवापासून विविध पक्षी, प्राणी तसेच आधुनिक युगाचे चित्र काढण्यात आलेली आहेत.  रसायनशास्त्र संकुलात आणि पदार्थविज्ञान संकुलात त्यांच्या विषयांसंदर्भात थीमनुसार रंगकाम झाले आहे. संगणकशास्त्र संकुलात संगणकाबरोबरच इंटरनेट तसेच विविध सॉफ्टवेअरचे चित्र रेखाटलेली आहेत. यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पस वैभवात भर पडले आहे.

विषयाला अनुसरून आनंद देणारी चित्रे
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संकुलनिहाय थीमनुसार भित्तिचित्रे काढण्याचे काम पूर्ण झालेले आहे. ही चित्रे विद्यार्थ्यांबरोबर सर्वांनाच आनंद व ऊर्जा देणारी आहेत. यामुळे कॅम्पच्या सौंदर्यातही पुन्हा भर पडलेले आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि येणाऱ्या प्रत्येकाला ही सुंदर चित्रे पाहून मनाला एक आनंद प्राप्त होईल. चित्रे पाहताच प्रत्येक बिल्डींगमध्ये कोणते अभ्यासक्रम शिकवले जाते, हेही कळण्यास मदत होणार आहे.
डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू

ज्ञानमंदिरातील चित्रांचा आनंद
ज्ञानमंदिर असणाऱ्या विद्यापीठातील महत्त्वाच्या वास्तूंवर विषयानुसार चित्रे रेखाटलेली आहेत. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या चित्रकार असल्याने त्यांचा कलात्मक दृष्टीकोन यातूनही दिसून येतो. काम करताना खूप छान वाटले व आनंद मिळाला. आजपर्यंत माझी चित्रे ही विविध कंपन्या, हॉटेल या ठिकाणी होती पण आज माझी भित्तिचित्रे विद्यापीठात आहेत, याचा मला अभिमान आहे. यासाठी कुलगुरू मॅडमचे मी आभार मानतो.
पुष्कराज गोरंटला, चित्रकार

भित्तीचित्रांवरून अभ्यासक्रमांची माहिती
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या विकासात्मक दूरदृष्टीकोनातून खूप सुंदर चित्रे विद्यापीठात रेखाटण्यात आली आहेत. प्रत्येक संकुलामध्ये प्रवेश करताच चित्रांवरून अभ्यासक्रमांची माहिती कळते. यातून एक वेगळा आनंद मिळत आहे. सर्वांनाच आवडणारी अभ्यासक्रमानुसार चित्रे प्रत्येकांना ऊर्जा देणारी ठरणार आहेत.
डॉ. व्ही. बी. पाटील, संचालक, नॅक विभाग