नववर्षाला विमानसेवा सुरू करणार : महापौर श्रीकांचना यन्नम

नववर्षाला विमानसेवा सुरू करणार : महापौर श्रीकांचना यन्नम

सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांसमोर महापौर यांनी निर्धार व्यक्त केला

सोलापूर : सोलापूरच्या युवकांचे स्थलांतर थांबवण्यासाठी आणि नवीन मोठे उद्योग सोलापूरात गुंतवणूक करण्यासाठी नागरी विमानसेवा अत्यंत गरजेची असून होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेस प्रमुख अडथळा असलेली चिमणी सहित सर्व अडथळे लवकरच दुर करुन नववर्ष दिनी नागरी विमानसेवा माझ्या कार्यकाळात सुरू करणार असल्याचे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांसमोर निर्धार व्यक्त केला. होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेस प्रमुख अडथळा असलेली श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाच्या टेंडर प्रक्रिया पुर्ण झाली असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याचे पत्र देखील सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना प्राप्त झाले असून लवकरच सोलापूरच्या विकासात प्रमुख अडथळा असलेली श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाचे कार्यारंभ लवकरच होईल. 

सोलापूरच्या खुंटलेल्या विकासाला विमानसेवा नवसंजीवनी देणार असून सोलापूरात येणाऱ्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील आणि प्रचंड प्रमाणात रोजगार निर्माण होईल असा आशावाद सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केला. सोलापूरातील होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूर विकास मंचचे सर्व सदस्यांनी गेल्या दोन वर्षांपासून अथक परिश्रम घेतले असून केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर अभ्यासपूर्ण मांडणी करून सदर विषयावर ठामपणे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला ज्यास सोलापूरातील सर्व स्थारातुन पाठिंबा मिळाला. सोलापूर विकास मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अॉफलाईन भेटीगाठी घेऊन तथा सोशल मिडियाच्या प्रभावी माध्यमातून होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवे संदर्भात असलेल्या सोलापूरकरांच्या सर्व शंकांचे निरसन समाधानकारक उत्तरे देऊन केले.

सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाचा विषयी यशस्वीपणे हाताळणी केल्या बद्दल महापौर श्रीकांचना यन्नम यांचे सर्वत्र कौतुक होत असून, येणाऱ्या काळात सोलापूरकरांचे अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी पुरवठा आणि उड्डाणपुलांचा विषयांची हाताळणी करावी अशी मागणी सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांना केली. होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेचे उद्घाटन केंद्रीय नागर उड्डयन मंत्री ज्योतिदित्य सिंदिया यांच्या हस्ते व्हावे अशी विनंती सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी केली. सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूरी देणार्‍या नगरसेवकांचे सोलापूर विकास मंचच्या वतीने आभार मानण्यात आले. महापौर श्रीकांचना यन्नम यांना सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवरचे निवेदन सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी महापौर यांना दिले ह्या वेळी केतनभाई शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, आनंद पाटील, विजय कुंदन जाधव उपस्थित होते.