चष्म्यामुळे पायलट होता आले नाही, आज आहेत डॅशिंग IPS...

चष्म्यामुळे पायलट होता आले नाही, आज आहेत डॅशिंग IPS...

SP तेजस्वी सातपुते यांचा आज आहे वाढदिवस! जाणून घेऊया यांच्याविषयी..

सोलापूर : सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा आज वाढदिवस आहे. डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ऑपरेशन परिवर्तन हाती घेऊन तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची मोहीम सुरू केली आहे. आज वाढदिवसानिमित्त सातपुते यांच्या विषयी जाणून घेऊया..

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या 2012 बॅच च्या आयपीएस आहेत. 2012 ते 2014 या कालावधीत त्यांचे प्रशिक्षण झाले. 

त्यांची पहिली पोस्टिंग परतूर या ठिकाणी सहाय्यक पोलिस अधिक्षक ही होती. या ठिकाणी एक वर्षभर त्यांच्याकडे जबाबदारी होती.

त्यानंतर सीआयडीमध्ये टेक्निकल विभागात पोलीस अधीक्षक पदावर त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर पुणे येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

पुणे जिल्ह्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर पोलीस उपायुक्त पदावर बदली झाली. त्यांच्याकडे वाहतूक विभागाचा पदभार होता. पुण्यातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले.

पुणे येथून तेजस्वी सातपुते यांची सातारा या ठिकाणी पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. सातारा या ठिकाणीही तेजस्वी सातपुते यांनी जोरदार कामगिरी केली.

कोरोनाच्या कालावधीत ऑक्टोबर 2020 मध्ये सोलापूर पोलीस अधीक्षक म्हणून सातपुते यांना जबाबदारी देण्यात आली. गेल्या सहा महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात तेजस्वी सातपुते यांची चांगल्या प्रकारे कामगिरी सुरू आहे. अवैध धंदे बंद करण्याच्या उद्देशाने तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवैध धंद्यात असलेल्या अनेक तरुणांनी परिवर्तनाचा मार्ग स्वीकारला आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे पायलट होण्‍याचे स्‍वप्‍न होते. पण त्यांना चष्मा लागल्याने पायलट होण्याचे पूर्ण होऊ शकले नाही. बारावीनंतर बायोटेक्नॉलॉजीत बीएससी केली. नंतर एलएलबीचे शिक्षण घेत २०१२ साली देशात १९८ क्रमांक मिळवून त्या आय पी एस झाल्या. यु. पी. एस.सी परिक्षेत यश संपादन केल्यावर त्यांच लग्न त्यावेळी दिल्ली स्थित असलेल्या किशोर रक्ताटे यांच्या सोबत झाले. किशोर रक्ताटे त्यावेळी केंद्रीय नियोजन आयोगात नोकरीस होते. त्यांना एक मुलगी आहे.

तेजस्वी सातपुते यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आहे. त्यांच्या घरची परिस्थिती तशी सामान्यच होती. एकूण सत्तावीस सदस्यांचे मोठे कुटुंब होते. एवढ्या मोठ्या कुटुंबात दहावी पास झालेली पहिली मुलगी म्हणून यांची घरात वेगळीच ओळख होती. कुटुंबात सर्वाधिक शिकलेली व्यक्ती म्हणजे यांच्या आई कृष्णाबाई. स्पर्धा परीक्षेतील अथवा शैक्षणिक क्षेत्रात वावरत असताना तेजस्वी यांच्यावर आई-वडिलांचा मोठा ठसा होता. कारण, काही कौटुंबिक अडचणीमुळे वडिलांना दहावीनंतर आयटीआय करून शिक्षण सोडावे लागले होते.