डबड्या शाळेचे रुप पालटले! नेहरूनगरची जिल्हा परिषद शाळा तालुक्यात प्रथम

डबड्या शाळेचे रुप पालटले! नेहरूनगरची जिल्हा परिषद शाळा तालुक्यात प्रथम

सोलापूर : मार्च दोन 2020 पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यामध्ये शाळा बंद असताना विद्यार्थ्यांविना वर्दळ अभावी शाळा उजाड आणि उदासित झालेल्या होत्या...परंतु नेमका याच परिस्थितीचा सदुपयोग करत सोलापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यामध्ये "स्वच्छ शाळा,सुंदर शाळा" या सुंदर उपक्रमाची सुरुवात झाली आणि जिल्हा भरातील कानाकोपऱ्यातील जि.प.च्या शाळा सजवण्यासाठी , भौतिक सुविधांची पूर्तता करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांची धडपड सुरू झाली. 

लोकवर्गणीतून आणि शिक्षकांनी स्वखर्चातून शाळा स्वच्छ व सुंदर केल्या. सोलापूर जिल्ह्याचा हा अभिनव उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आदर्शवत ठरला. या अभियानामध्ये केंद्र स्तर, तालुकास्तर व जिल्हास्तर या तीन स्तरावर शाळांची मुद्दे निहाय पडताळणी नियोजित समिती मार्फत करण्यात आली व शाळांना गुणांकन करण्यात आले... आणि त्यातून केंद्र व तालुका स्तरावरील मूल्यांकन पूर्ण करून गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक शाळांना देण्यात आले. यामध्ये जि.प.प्रा.शाळा नेहरूनगर,सोलापूर ही शाळा इयत्ता १ली ते ४थी या गटातून कुमठे केंद्रात व उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वप्रथम आली.

मागील काही वर्षांमध्ये या शाळेची अतिशय दुरावस्था झाली होती, तालुक्यातील सर्वात कमी दर्जाची शाळा म्हणून या शाळेची ओळख होती. परिसरातील लोक या शाळेला उपहासाने डबडी शाळा म्हणून ओळखत होते. परंतु जून 2019 रोजी या  शाळेमध्ये श्री. अनिल थोरबोले सर व श्रीमती सुरेखा गेंगाणे मॅडम हे दोन शिक्षक शाळेत हजर झाले आणि या डबडी शाळेचे रूप पालटण्यासाठी सुरुवात झाली.... शाळेच्या परिसरात अनेक खाजगी शाळा असल्याने पटासाठी खूप प्रयत्न करून, अनेक नवीन उपक्रम राबवत एक एक विद्यार्थी जमवून अथक प्रयत्नातून आणि अत्यंत चिकाटीने शाळेचा पट केवळ 10 वरून आज 40 झालेला आहे.

शाळेतील मुलांची गुणवत्ता बघून परिसरातील पालक नामांकित शाळातून काढून आपल्या पाल्यास या शाळेत प्रवेश घेत आहेत. कोरोना कालावधीमध्ये सुद्धा अगदी शेवटच्या विद्यार्थ्या पर्यंत शिक्षण देण्याचं प्रमाणिक काम शाळेतील शिक्षकांनी केलेले आहे.

स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानात सदर शाळेने भाग घेऊन शाळेची परिसर स्वच्छता, मैदान सपाटीकरण,डागडुजी रंगरंगोटी, किरकोळ बांधकाम,शौचालय दुरुस्ती, मैदानात 100 वृक्षांची लागवड आणि सर्व भौतिक सुविधा पूर्ण करून शाळेने पडताळणी तील सर्व बाबींची पूर्तता करत सर्व सोयीसुविधा युक्त अतिशय सुंदर व आकर्षक शाळा झाली आहे. म्हणून केंद्र व तालुका पडताळणीत 92 मार्क मिळवून शाळा कुमठे केंद्रात व उत्तर सोलापूर तालुक्यात सर्व प्रथम आलेले आहे.
तालुक्यातील सर्वात शेवटच्या नंबर वर असलेल्या शाळेचा लास्ट नंबर ते फर्स्ट नंबर वर येण्याचा प्रवास खूपच कष्टाचा,जिद्दीचा आणि चिकाटीचा असला तरी मनाला खूप मोठे समाधान आणि आनंद देणारा आहे असे शाळेचे मुख्याध्यापक श्री.अनिल थोरबोले यांनी बोलताना सांगितले.

शाळेत 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने 75 वृक्षांची लागवड मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,श्री. दिलीप स्वामी साहेब आणि मनपा उपायुक्त श्री.धनराज पांडे साहेब यांच्या शुभहस्ते व हॅपी टू हेल्प फौंडेशन, सोलापुर यांच्या सहकार्याने करण्यात आले.

शाळेला अनेक अधिकाऱ्यांनी भेटी देऊन शाळेविषयी खूप मोठे समाधान व्यक्त केले आहे. शाळेकडे बघून... गेल्या 50 वर्षांमध्ये शाळेचे असे सुंदर रूप आम्ही प्रथमच बघत आहोत असे परिसरातील वयस्कर मंडळी बोलत आहेत. पालकांचा हा अनौपचारिक अभिप्राय हाच शाळेचा मोठा सन्मान आहे व  शिक्षकांच्या कामाची पावती आहे असे श्री.गटशिक्षणाधिकारी श्री.जमादार साहेब म्हणाले.
 
शाळेच्या या सौंदर्यीकरण साठी  शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल थोरबोले सर श्रीमती सुरेखा गेंगाणे मॅडम, शालेय पोषण आहार स्वयंपाकी श्री.सचिन राठोड, शा. व्य. समिती अध्यक्षा सौ. सुनिता चव्हाण शाळेतील विद्यार्थी व सर्व पालक यांनी अथक परिश्रम घेतले .

तसेच याकामी श्री.म.ज. मोरे सर,श्री.प्रकाश राचेटी सर,श्री.गरड सर,श्री. उमराणी सर व श्री.संतोष पवार सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.  शाळेच्या या यशाबद्दल सोलापूर जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप स्वामी साहेब शिक्षणाधिकारी,डॉ. किरण लोहार साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री. जमादार साहेब, विस्ताराधिकारी श्रीमती. गोदावरी राठोड मॅडम, केंद्रप्रमुख श्री.सिद्राम वाघमोडे साहेब व नगरसेविका मा. अश्विनी ताई चव्हाण  यांनी अभिनंदन केले.