‘झाडांच्या नावानं चांगभलं’! मैत्री दिनी 5555 वृक्ष लागवडीचा शुभारंभ

‘झाडांच्या नावानं चांगभलं’! मैत्री दिनी 5555 वृक्ष लागवडीचा शुभारंभ

हॅपी टू हेल्प फाउंडेशनची ‘मित्र बन’ संकल्पना; 

सोलापूर : हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्यावतीने मैत्री दिनाच्या निमित्ताने कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 5 हजार 555 वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा शुभारंभ रविवारी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ‘झाडांच्या नावानं चांगभलं...’चा जयघोष करण्यात आला. 

नेहरूनगर येथील जागृती विद्यामंदिर शाळेच्या मैदानात वृक्षारोपण करून ‘मित्र बन’ या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. सोलापूर महापालिकेच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याप्रसंगी वनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, जागृती विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विजयरत्न चव्हाण, महापालिकेचे पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलनकर, उद्यान अधीक्षक निशिकांत कांबळे, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष मदन पोलके उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी ‘वडाच्या नावानं चांगभलं.., कडूलिंबाच्या नावानं चांगभलं.., झाडाच्या नावानं चांगभलं..’ चा जयघोष करण्यात आला.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘मित्र बन‘ उपक्रमाचे कौतूक केले. ‘मानव नष्ट झाला तरी झाडे जगतील, पण झाडे नष्ट झाली तर मानव जगणार नाही. झाडं आपल्यावर अवलंबून नाहीत आपण झाडांवर अवलंबून आहोत, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. हॅपी टू हेल्प फाउंडेशनने मैत्री दिनाच्या निमित्ताने वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियानाचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. यातून सर्वांना प्रेरणा मिळणार आहे’ असे पोलीस अधीक्षक सातपुते यावेळी म्हणाल्या.

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हॅपी टू हेल्प फाउंडेशनने हाती घेतलेल्या 5 हजार 555 वृक्ष लागवड व संवर्धन अभियानाला महापालिकेकडून सर्व प्रकारचे सहकार्य आम्ही करत आहोत, असे सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी यावेळी सांगितले. ‘मित्र बन’ ही खरोखरचं स्वागतार्ह संकल्पना आहे. वृक्षारोपणासाठी महापालिका हद्दीत जागा उपलब्ध करून दिली जात आहे. सोलापूरला स्मार्ट सिटीसोबतच ग्रीन सिटी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहनही पांडे यांनी यावेळी केले. 

सविता नागुर यांनी प्रास्ताविक केले. मित्र बन या संकल्पनेची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष मदन पोलके यांनी दिली. अश्विनी मोरे-वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले. हिरामण पवार यांनी आभार मानले.

शहिद जवानांच्या स्मरणार्थ आम्ही मित्रांनी ‘मित्र बन’ ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. सर्व मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळेच हा उपक्रम प्रत्यक्षात येत आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्षारोपणासाठी सोलापूर महापालिकेने आम्हाला मोठ्या प्रमाणात जागा आहे. 5 हजार 555 वृक्ष लागवड आणि संवर्धन केले जाणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी कृतीशील होण्याची गरज आहे. 
- मदन पोलके, संस्थापक अध्यक्ष, हॅपी टू हेल्प फाउंडेशन