उजनी जलाशय पर्यटनवाढीसाठी ‘या’ मुद्द्यांचा व्हावा विचार!

उजनी जलाशय पर्यटनवाढीसाठी ‘या’ मुद्द्यांचा व्हावा विचार!

भाजपा नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन 

सोलापूर : उजनी जलाशय परिसरात पर्यटन वाढीसाठी मोठी संधी आहे. या परिसरात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. 

धैर्यशील मोहिते-पाटील म्हणतात, ‘उजनी जलाशयाचा परीसर सहा किमी रुंद तर 140 किमी लांब असा भीमानगर ते दौंड पट्ट्यापर्यंत प्रचंड मोठा आहे. त्यामुळे नौकाविहार करण्याचा एक अविस्मरणीय अनुभव येथे येतो. पक्षी पाहण्यासाठी येणारे अनेक पर्यटक किमान एकदा तरी नौकाविहार करतातच. तसेच अनेक मच्छीमार तरुण नौकाविहार आणि पक्षी पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून देतात. विस्तीर्ण जलाशयामुळे जलविहार करण्यासाठी येथे मोठी संधी आहे पर्यटक या संधीचा लाभ घेत असतात मात्र मागील काही वर्षांपासून पर्यटक जलविहार करत असताना बोट उलटून जिवीतहानी झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत अशीच एक ताजी घटना २८ फेब्रुवारी २०२१ रोजी करमाळा तालुक्यातील वांगी येथे उजनीच्या बॅकवाॅरट मध्ये घडली नौकाविहार करत असताना नाविकाचे बोटवरचे नियंत्रण सुटल्याने बोट उलटून अकलूज येथील पिता पुत्रांचा दुर्दैवी मृत्यु झाला. उजनी जलाशयातील नौकाविहार करताना वारंवार दुर्दैवी घटना घडत आहेत त्यामुळे पर्यटनावर देखील विपरीत परिणाम होताना दिसत आहे

नौकाविहारासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींचा सुरक्षिततेच्या दृष्टीनेही विचार करावा बोटी चालवणा-या नाविकाना सुरक्षितरीत्या बोट चालवण्याचे प्रशिक्षणाची तरतूद शासनाकडून करण्यात यावी.शासनाने शासकीय किंवा परवाना पद्धतीने बोटिंगची व्यवस्था करण्याची आवश्‍यकता आहे. पर्यटकांना लाईफ जॅकेटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, शासनाकडून उजनी जलाशयात बोटींग साठी पर्यटनस्थळे निश्चित करावीत.

जलविहार करत जलाशयावरील पक्ष्यांच्या विलोभनीय कवायती डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्याच असतात. सध्या काही तरुण व मच्छीमार पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद देतात पण याकडे रोजगारनिर्मितीचे मोठे साधन म्हणून पाहणे गरजेचे आहे यासाठी पर्यटकांची जेवढी सुरक्षेची काळजी घेता येईल तेवढी खबरदारी शासनाने घ्यावी.’

पर्यटनवाढीसाठी शासनस्तरावर पर्यटन विकास केंद्र, पक्षी निरीक्षण केंद्र, मत्स्य अभ्यास केंद्र, वनस्पती अभ्यास केंद्र व्हावे,पक्षी निरीक्षणासाठी ठिकठिकाणी टॉवरची आवश्‍यकता, पर्यावरणाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न व्हावेत, दुर्दैवी घटना टाळण्यासाठी बॅकवॉटरमध्ये ठिकठिकाणी नौकाविहारासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लाईफ जॅकेट पुरवावे, शासकीय किंवा परवाना पद्धतीने प्रशिक्षित बोटिंगची व्यवस्था गरजेची आहे जेणे करून भविष्यात पर्यटकांच्या बोटींच्या  अपघाताच्या घटना टाळता येऊ शकतील, असेही धैर्यशील राजसिंह मोहीते पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.