पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी होम मैदान सज्ज
PM Narendra Modi At Solapur Ram Satpute BJP Solapur Loksabha Election
स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या यूट्यूब चॅनलवर होणार लाईव्ह
भव्य मंडपात बसून सोलापूरकर ऐकणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण
वाढत्या उन्हामुळे केली सोय : आज दुपारी १२.३० वाजता होणार सभा
सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे राजकीय वातावरण गरम झालेले असताना ऊन देखील वाढत आहे. आज सोलापुरात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता होम मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. आज सोमवारी दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ होत आहे.
होम मैदानावर मंडप उभारण्याचे काम पूर्ण झाले असून तब्बल ८० हजार खुर्च्या या मंडपात ठेवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर होम मैदानापासून जवळच्या अंतरावर ठिकठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहेत. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी या ठिकाणी दुचाकी आणि चार चाकी वाहने लावावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
या सभेसाठी नागरिकांना होम मैदानामध्ये मार्केट पोलीस चौकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथूनच प्रवेश दिला जाणार आहे. मंगळवेढा व पंढरपूरकडून तसेच जुना पुणे नाका, तुळजापूर रोडकडून वाहनातून येणाऱ्या नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी नागरिकांना उतरवून त्यांची वाहने जुनी मिल कंपाऊंड व मरीआई चौक येथील एक्जीबिशन ग्राउंड येथे लावावीत.
अक्कलकोटकडून येणारी वाहने नागरिकांना सिव्हील चौक येथे नागरिकांना उतरवून पुंजाल मैदान किंवा नुमवि प्रशाला पाठीमागील मुलांचे शासकीय वस्तीगृह मैदान येथे वाहने लावावीत. होटगी रोड करून येणारी वाहने विजापूर रोड, पत्रकार भवन मोदी पोलीस चौकीमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नागरिकांना उतरवून संगमेश्वर महाविद्यालयाजवळील स्काऊट गाईड मैदान किंवा नुमवि प्रशाला पाठीमागील मुलांचे शासकीय वस्तीगृह मैदान येथे वाहने लावावीत. तसेच नॉर्थकोट मैदान व हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुचाकी वाहने लावता येतील, असे प्रशासनाने कळवले आहे.