सोलापुरात दोन दिवस आंतरराष्ट्रीय वाळवी नियंत्रण कार्यशाळा
valavi niyantran karyashala solapur
प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाळवी नियंत्रण तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
सोलापूर : पेस्ट मॅनेजमेंट असोसिएशन आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) यांच्या संयुक्त विद्यमाने वाळवी नियंत्रणावर आधारित दोन दिवसीय प्रमाणपत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दिनांक ९ व १० नोव्हेंबर २०२४ रोजी सोलापूर येथील सोरेगाव भागातील शांग्रीला रिसॉर्ट येथे पार पडणार आहे.
या कार्यशाळेत वाळवी नियंत्रणासाठी भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे प्रमाणित, सुधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्यांना वाळवी नियंत्रणाच्या क्षेत्रातील व्यावसायिक तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान मिळणार आहे.
कार्यशाळेसाठी डॉ. सारंग सावळेकर आणि डॉ. अनिल माजगावकर यांच्यासह पेस्ट मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष राजीव सेन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. संपूर्ण भारतातून या कार्यशाळेत ७५ हून अधिक तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पेस्ट मॅनेजमेंट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रतिनिधी विजयराज बाहेती यांनी दिली आहे. या कार्यशाळेमुळे शेतकरी, उद्योजक आणि गृहस्वामींना वाळवी नियंत्रणाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल, तसेच यामध्ये प्रगत पद्धतींचा वापर कसा करावा याचे शिक्षण मिळेल, असे कळविण्यात आले आहे.
सोलापूर शहरात दरवर्षी 100 करोडचे फर्निचर वाळवी फस्त करते. एखाद्या गोष्टीचे प्रगत आणि इत्यंभूत शिक्षण मिळवण्यासाठी सोलापूर व सोलापूर सारख्या अनेक शहरांना पुणे, मुंबई, दिल्ली अशा मोठ्या शहराची आस धरावी लागते आहे. पण प्रथमच सोलापुरात असे अनोखी कार्यशाळा होत आहे.
जे शिकण्यासाठी दिल्ली बेंगलोर हैदराबाद छत्तीसगड इथून लोक सोलापुरात येत आहे.
– विजय बाहेती,
प्रतिनिधी, पेस्ट मॅनेजमेंट असोसिएशन