सोलापूर : महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात सोलापूरच्या कन्यांनी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) तर्फे आयोजित ‘अस्मिता सिटी लीग झोनल राउंड’ या राष्ट्रीय स्तरावरील अंडर 13 फुटबॉल स्पर्धेसाठी सोलापूरच्या 4 खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. यामध्ये अद्विका एच. जी. रोकडे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत निवड चाचणीत स्थान पटकावले आहे.
सोलापूरच्या सेंट जोसेफ शाळेची विद्यार्थिनी असलेली अद्विका सातवीमध्ये शिकत आहे. अद्विका सोलापूरचे भुलतज्ञ डॉ. गोरख रोकडे आणि डॉ. हेमलता रोकडे यांची कन्या आहे. अद्विकाच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक कूपरेज फुटबॉल ग्राऊंडवर १८ जानेवारी २०२६ पासून विशेष सराव शिबिर (Coaching Camp) आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्वोत्तम 6 खेळाडूंना पाचारण करण्यात आले होते, त्यापैकी 4 जणींची अंतिम निवडीसाठी मोहर उमटवण्यात आली.
निवड चाचणीत अद्विकाची बाजी
अद्विकाने ३२ खेळाडूंच्या अंडर 13 वयोगटातील आव्हानात्मक निवड चाचणीत सहभाग घेतला होता. या चुरशीच्या स्पर्धेत तिने ९व्या क्रमांकावर झेप घेत आपले संघामधील स्थान निश्चित केले आहे. तिची ही निवड सोलापूरच्या फुटबॉल क्षेत्रासाठी अत्यंत प्रेरणादायी मानली जात आहे.
गुजरातमध्ये रंगणार राष्ट्रीय सामने
आता हा महाराष्ट्र संघ गुजरातमध्ये होणाऱ्या अस्मिता सिटी लीग झोनल राउंड या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. ही स्पर्धा २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडणार असून, अद्विका आणि तिच्या सहकारी खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. एकूण 32 पैकी 11 जणांची तर सोलापूरमधील 6 पैकी 4 जणांची निवड झाली आहे.
अद्विकाच्या या यशामुळे सोलापूर जिल्हा फुटबॉल असोसिएशन आणि क्रीडा प्रेमींकडून तिचे भरभरून कौतुक होत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सुवर्ण यश मिळवेल, अशी सर्वांना खात्री आहे.










