भाजप शहराध्यक्षपदी नरेंद्र काळे; कोणाचा बदला घेणार?

BJP Solapur Narendra Kale Sachin Kalyanshetti Chetan Kedar Sawant News
सोलापूर : सोलापुरातील अंतर्गत राजकारणामुळे बाजूला पडलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, माजी नगरसेवक नरेंद्र काळे यांची भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर माढा विभाग जिल्हाध्यक्षपदी चेतन केदार-सावंत यांना संधी मिळाली आहे.
नरेंद्र काळे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे. सुरुवातीच्या काळात ते आमदार सुभाष देशमुख यांच्यासोबत होते. अंतर्गत राजकारणामुळे नरेंद्र काळे सुभाष देशमुख यांच्यापासून दूर गेले. सध्या ते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या जवळ असल्याचे सांगितले जाते. मध्यंतरीच्या काळात नरेंद्र काळे राजकारणापासून काही काळ बाजूला गेले होते.
भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष पदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. वरिष्ठ नेत्यांनी नरेंद्र काळे यांना संधी दिली आहे. अलीकडेच भारतीय जनता पार्टीमधील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी बीआरएस पक्षात गेले आहेत. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र काळे यांच्यावर पक्षाने ही मोठी जबाबदारी दिली आहे. ज्यांच्यामुळे राजकारणापासून दूर राहावे लागले त्यांचा बदला नरेंद्र काळे घेणार का हे येणाऱ्या काळात पहावे लागेल.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून उत्तम प्रकारे संघटन बांधणी केल्यामुळे त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे.