जुळे सोलापुरातील बस सेवा पूर्ववत!

जुळे सोलापुरातील बस सेवा पूर्ववत!

Jule Solapur Bus Service News

सोलापूर : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर बंद असलेली ज्ञानेश्वर नगर (जुळे सोलापूर) ते कौतंम चौक  बससेवा १५ मे पासून पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. यावेळी बसचे चालक कुलदीप कटारे व महिला कंडक्टर रूपाली कल्याण शेट्टी यांचा सन्मान जेष्ठ नागरिक, पत्रलेखक विनोद आपटे यांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते आणि पीएम क्रिकेट क्लबचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर माळगे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे बस सेवा सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून बससेवा  बंद असल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तसेच नोकरदारांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. सोमवारी सकाळपासून जुळे सोलापूरकरांची बस पुन्हा धावू लागली. बस पूर्ववत सुरू झाल्याने  ये-जा  करणाऱ्या प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित सेवा उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त प्रवासी नागरिकांनी या बस सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएम क्रिकेट क्लब कडून करण्यात आले आहे.

सकाळी 7 वाजल्यापासून दर 2 तासाला बस येणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळेस पीएम क्रिकेट क्लबचे प्रकाश स्वामी, ज्येष्ठ पत्रकार संजय रुपनर, एच के जाधव, शहा, सचिन धवन, श्रीकांत पाटील, स्वप्निल इंगळे, श्रीकांत जमादार,  इम्रान शेख सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बसचा मार्ग : 
ज्ञानेश्वर नगर (जुळे सोलापूर) पासून – पाण्याची टाकी, प्रसाद नगर, मीरा पीठाची गिरणी, दावत चौक, विजापूर रोड, रंगभवन, डफरिन चौक, एसटी स्टॅन्ड, बाळीवेस, टिळक चौक, कौतंम चौक

--
कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये महानगरपालिकेने जुळे सोलापुरातील बस सेवा बंद केली होती. ही बस सेवा पूर्ववत चालू व्हावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
- परमेश्वर माळगे,
सामाजिक कार्यकर्ते