पंढरपूरच्या वारीत पेढा खाताय? सावधान...

पंढरपूरच्या वारीत पेढा खाताय? सावधान...

सोलापूर : अन्न व औषध प्रशासनमार्फत पंढरपूर शहरात भेसळ युक्त पेढा जप्त करण्यात आला आहे.

दिनांक  ०५/०७/२०२२  रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात आषाढी वारीत सिंहगड कॉलेज, पंढरपूर येथील अन्न सुरक्षा स्वयंसेवक व अन्न व औषध प्रशासन, सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर व उमेश भुसे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे पश्चिम द्वार, पंढरपूर येथील श्री पिरगौडा शिवपत्र कोट्टली यांच्या अस्थायी पेढीची तपासणी केली. पेढीत विक्रीस ठेवण्यात आलेल्या पेढ्याचा संशय आल्याने सदर पेढ्यात जागेवर आयोडीन टाकून पाहिले असता सदर पेढ्यात स्टार्च या अन्न पदार्थाची भेसळ असल्याचे आढळून आले. 

सदर पेढ्याचे ३ अनौपचारिक अन्न नमुने घेऊन उर्वरित साठा अंदाजे १५० किलो, किं. रु. ६००००/- चा साठा जप्त करुन सदर पेढा भेसळ युक्त असल्याने जागेवर नष्ट करण्यात आला. सदर प्रकरणी भा द वी कलम 272 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे चालू आहे.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर व यु. एस. भुसे यांनी सिंहगड कॉलेजच्या अन्न सुरक्षा स्वयंसेवकांसोबत पुर्ण केली.