स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लघुउद्योग!

Samyak Academy Solapur News
सोलापूर : माणूस दिसतो कसा यापेक्षा असतो कसा हे महत्त्वाचे आहे. माणसाने जन्मभर प्राणिमात्रांच्या, माणसांच्या कामी आले पाहिजे. माणुसकी धर्म हा सर्व धर्मात मोठा धर्म आहे म्हणून मानवता हा सर्व सद्गुणांचा पाया आहे. प्रत्येकाने तो भक्कम करावा. जेणेकरून माणुसकी धर्म जोपासला जाईल असे महत्वपूर्ण विचार संतसेवा मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते डॉ जयंत करंदीकर यांनी मांडले.
ते सम्यक अकॅडमी सोलापूर आयोजित " संघर्षिका " लघुउद्योग उद्घाटन आणि मुलींच्या मोफत वसतिगृहाचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शासनाचे राज्यकर अधिकारी अमोल वरखेडे हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते.
यावेळी बोलताना राज्यकर अधिकारी अमोल वरखेडे म्हणाले की माणसाचे विचार मोठे असून चालत नाही त्यांचे आचरण चांगले आणि लोकोपयोगी असणे महत्त्वाचे आहे. स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करून, या विद्यार्थ्यांना लघुउद्योग सुरु करुन आणि मुलींसाठी मोफत वसतिगृहाचा भूमिपूजन समारंभ घडवून सम्यक अकॅडमीने विचार कृतीत आणले आहेत.
यावेळी डॉ साधना करंदीकर, राज्य कर सहायक कुणाल कल्याणकर( मुंबई ),भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या मोनाली भालशंकर-मेश्राम, सम्यक अकॅडमीच्या विद्यार्थिनी कु भाग्यश्री गायकवाड, कृपा जाधव इत्यादीनी आपले विचार मांडले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले की महामानवाची नावे घेऊन चालणार नाही, त्यांच्या विचाराने आचरण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सम्यक परिवाराच्यावतीने मुलींच्या मोफत वसतिगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे.
या लघुउद्योग उद्घाटन आणि मुलींचे मोफत वसतिगृह भूमिपूजन प्रसंगी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरु जाधव, बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे, दत्तात्रय शिंदे,पत्रकार भरतकुमार मोरे,नारायण घंटे, रवी देवकर,संग्राम कांबळे,प्रा अभिजित भंडारे, समता सैनिक दलाचे प्रा जगन्नाथ शिंगे, प्रकाश घटकांबळे, आशुतोष तोंडसे, सम्यक अकॅडमीचे विद्यार्थी त्यांचे पालक, नालंदा नगरातील रहिवासी, भालशंकर,मेश्राम कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्यक अकॅडमीचे समन्वयक राज्य कर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी केले सूत्रसंचालन सरस्वती कोकणे यांनी तर विशाल माळी यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पल्लवी मेश्राम, मुक्ता आतकरे, प्राजक्ता कांबळे, भौरम्मा वाघमारे, ज्योती चव्हाण, साक्षी सोनकांबळे, मीना राठोड, संदीप चव्हाण, कैलास माने, विष्णू लादे यांनी परिश्रम घेतले.