गाड्या वाहू लागल्या; पेट्रोल पंपातही पाणीच पाणी!

सोलापूर : शनिवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. तीन वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पहिल्याच पावसाने सर्वत्र गारवा निर्माण झाला. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले.
गणेश पेठ शॉपिंग सेंटर परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले. नाल्यातील पाणी रस्त्यावर आणि रस्त्यावरील पाणी नाल्यात अशी स्थिती निर्माण झाली. शॉपिंग सेंटर परिसरात लावलेली दुचाकी वाहने वाहून जाऊ लागली. दुकानदारांनी हातातले काम बाजूला सोडून वाहने वाचवण्यासाठी धडपड केली. समोरच असलेल्या चडचणकर पेट्रोल पंप परिसरातही पाणी साचले. या परिसरात बराच वेळ गोंधळाचे वातावरण होते.
Video -
सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पावसामुळे तापमान खाली आले. कमाल तापमान 35.7 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25.4 अंश सेल्सियस होते.
कोनापुरे चाळ परिसरात सुद्धा अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. तसेच शहरातील अनेक सखल भागात पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडाली.
Video -
आज सकाळी 8 ते सायंकाळी 5:30 पर्यंत अडीच इंचाच्या वर म्हणजे 66.2 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
आजचा पाऊस सोलापूर शहरासह पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा चा काही भाग येथे झाला आहे.
शनिवारी रात्री साडेआठपर्यंत पावसाची आकडेवारी ६९.० मिलिमीटर इतकी होती.