खुशखबर! कुडल संगम दर्शनासाठी 2 वेळा सिटीबस

खुशखबर! कुडल संगम दर्शनासाठी 2 वेळा सिटीबस

सोलापूर : श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल येथील श्री संगमेश्वरांच्या दर्शनाला येणाऱ्या प्रवाश्यांच्या सोयीसाठी सोलापूरहून दररोज दोन सिटीबसच्या फेर्‍या होणार आहेत.

सिटीबस सुटण्याचे ठिकाण - 
राजेंद्र चौक, सोलापूर

ही बस छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रंगभवन, सात रस्ता, विजापूर रोड मार्गे कुडल संगमकडे जाणार आहे.

वेळ - दररोज सकाळी - 8 आणि दुपारी -3.45 वाजता

कुडल संगम येथून सोलापूरकडे सिटीबस सुटायची वेळ दररोज सकाळी 10 वाजता
सायंकाळी 5.15 वाजता 

या दोन्ही बसेस टाकळीमार्गे धावणार आहेत. 

अधिक मासानिमित्त कुडल संगम येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसह बाजारपेठेसाठी सोलापूरला जाणारे ग्रामस्थ, पर्यटक, शालेय विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, व्यापारी इत्यादींनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संगमेश्वर परिसर सुधारणा समिती व सोलापूर महानगरपालिका परिवहन समितीने केले आहे.

काय आहे हत्तरसंग कुडलसंगमला?

हत्तरसंग कुडलसंगम हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामधील दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेले स्थळ आहे. कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम असा आहे. येथे भीमा व सीना या दोन नद्यांचा संगम असून तेथे अत्यंत जुनी हेमाडपंती संगमेश्वर आणि हरिहरेश्वर मंदिरे आहेत. संगमेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या तुळईवर इ.सन.१०१८ (शके ९४०)मध्ये कोरलेला पहिला मराठी शिलालेख आहे.

सोलापुरातील दयानंद कॉलेज मधील प्राध्यापक इतिहास संशोधक श्री भिडे यांनी सदर मंदिर जगा समोर आणले असून आनंद कुंभार यांनी ह्या शिलालेखाचा अर्थ लावला. हा शिलालेख ‘माय मराठी’च्या उत्पत्ती संशोधनात महत्त्वाचा गाभा ठरतो आहे. १०१८ साली कोरण्यात आलेला हा शिलालेख मराठी भाषेतील आद्यग्रंथ श्री ज्ञानेश्वरीपेक्षा १८२ वर्षे जुना आहे. संशोधक कुंभार यांनी दिलेल्या शिलालेखाच्या पुराव्याला पुण्याचे इतिहास संशोधक डॉ. शं. गो. तुळपुळे व वि.ल. भावे यांनीही पुष्टी दिली आहे व हा शिलालेख सर्वात पुरातन असल्याचे प्रतिपादन केले आहे.


हा शिलालेख सापडण्यापूर्वी मराठीतील सर्वात जुना शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील श्री गोमटेश्वराच्या पायाजवळ असल्याचे मानण्यात येत होते. परंतु तो लेख इ.स १०३९ (शके ९६१ ) वर्षातील होता.


या कुडलसंगम येथील शिलालेखाची लांबी ९४ सेंमी तर रुंदी १६ सेंमी आहे. तुळईची शिळा घडीव असून खोदण्यापूर्वी ती घासून गुळगळीत करून घेतल्याचे दिसते. शिलालेखावरील अक्षरांची उंची सुमारे एक सेंमी आहे. यावर कोरलेला हा अंक नागमोडी वळणातील त्या काळातील लिपीतील असल्याने बोध होत नाही. पण नागपूरचे डॉ. वा. वि. मिराशी यांनी अशाच प्रकारचा अंक दिवेआगार येथील ताम्रपटात आहे असे स्पष्ट केले आहे.

हत्तरसंग कुडलसंगम येथील या शिलालेखावर अडीच ओळी लिहिल्या आहेत. पहिली ओळ ‘स्वस्ति श्री शके ९४० कालयुक्त संवत्सरे माघ कधनुळिकाळ छेळा’ तर दुसरी ओळ ‘पंडित गछतो आयाता मछ मि छिमळनी १०००’ अशी संस्कृतमधील आहे. शेवटच्या तिसऱ्या ओळीत ‘यवाछि तो विजेया हो ऐवा’ असे स्पष्ट मराठीत कोरले आहे. शिलालेखावरीलसंदेश अर्थपूर्ण आहे. तसेच शिलालेखात एका दानशूराने त्याकाळी चलनात असलेले हजार निष्क देणगी दिल्याचा उल्लेख आहे. हाच आद्य मराठी शिलालेख असल्याचे आता सिद्ध झाले आहे. 

याच परिसरात 360 शिवलिंग असलेले मोठे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते.